नवरस आणि देवी शिल्पे या लेखमालेत आत्तापर्यंत आपण, उमा महेश्वर आलिंगन मूर्तीमधून शृंगार रस आणि मागच्या लेखातून सप्तमातृका पटातील हास्य रसाची अभिव्यक्ती जाणून घेतली, या भागामध्ये देवी शिल्प आणि करुण रस याची माहिती घेऊया.
करुण रसाचा स्थायीभाव शोक आहे. नाट्यशास्त्रामध्ये या रसाची व्याख्या करताना शाप, क्लेश, पतन, वियोग, हानी, मृत्य अश्या विभावांमुळे करुण रस उत्पत्ती होते असे सांगितले आहे. आचार्य श्रीशंकुक यांच्या मते दयायुक्त हृदयाचा भाव करुण मानला आहे. अर्थात हे मत नाट्यशास्त्रदृष्टीने तितकेसे मान्य नाही. परंतु शिल्पशास्त्र आणि रसभाव यांचा एकत्रित विचार करता देवी शिल्पांमध्ये करूण रसासाठी आचार्यांचे मत समर्पक ठरु शकते. देवी शिल्पाच्या तत्त्वातून, दयाभावातून निर्माण होणारी करुणा अधिक योग्य पद्धतीने समजू शकते.
चित्रसूत्रात करुण रसाला पुढीलप्रमाणे श्लोकबद्ध केले आहे –
याञ्चाविरहसंत्यागविक्रियाव्यासनादिषु |
अनुकम्पितकं यत्स्याल्लिखेत्तेत्करुणे रसे ||
म्हणजेच चित्रामध्ये करुण रस दाखवताना याचना, वियोग, त्याग, विपदा किंवा आपत्ती अश्या पद्धतीची परिस्थिती दाखवावी. वरील श्लोकाचा आधार घेत देवी शिल्पामधील करुण भाव समजून घेऊ.
प्राचीन काळापासून भारतीय परंपरेत स्त्री-देवता हा एक महत्त्वाचा भाग होता आणि आजही तो आहे. जगातल्या अनेक संस्कृतींमध्ये देवीची माता या स्वरूपात पूजा होत आली आहे. मातृदेवतांची पूजा आणि त्यांचे प्राबल्य पूर्वीपासूनच दिसते. देवीच्या जगन्माता स्वरूपात मनुष्याने सृजन, भरण, पोषण, क्षमा, शांती, दया, ममत्व कल्पून तिची कृपा आणि तिचा वरदहस्त प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. देवीच्या सौम्य, रौद्र आणि भयानक अश्या सर्वच रूपांमध्ये ती करुणामयी असल्याचे पुरावे पुराणकथांमधील तिच्या वर्णनावरून मिळतात.
कारुण्यरूपा त्रिपुरा
देवीच्या माता स्वरूपांमध्ये स्थायीभाव हा करुणा आहे. त्यामुळे वाईट शक्ती आणि अज्ञान यांचा नाश करून भक्ताला सुरक्षा, शांती प्रदान करते. शिल्पांमध्ये देवीची अनेक स्वरूपे ही करुण रसाची उदाहरणे म्हणून घेता येतील. Elements of Hindu Iconography मध्ये गोपीनाथ राव यांनी त्रिपुरा या देवीचा उल्लेख केला आहे. गौरीचे एक स्वरूप म्हणजे त्रिपुरा. चतुर्भुजा देवीच्या मागच्या दोन हातामध्ये अंकुश आणि पाश ही दोन आयुधे आहेत. तिचे पुढील दोन हात हे अभय आणि वरद प्रदान करणारे शिल्पांकित केलेले असतात. भद्रपीठावर पद्मासनात त्रिपुरा बसलेली शिल्पांकित केली आहे. डोक्यावर जटामुकुट आणि त्रिनेत्र असे तिचे स्वरूप आहे. वर म्हटल्याप्रमाणे देवीच्या हृदयात भक्तासाठी दयाभाव उत्पन्न झाला तर करुण रस म्हणता येईल. देवीचे अभय आणि वरद हस्त तिच्या करुणामयी भावाचे दर्शन या शिल्पातून घडवत आहेत. अभय हस्ताच्या रूपात भक्तांना अभय देणारी आणि वरद हस्ताच्या रूपात या औदार्याच्या बदल्यात काहीही न मागता सर्वांवर दयादृष्टी हा भाव देवीच्या मूर्तीमधून प्रतीत होत आहे.
भक्ताला अभय देणारे देवी शिल्प महाबलीपुरम येथील वराह गुंफेमध्येही बघायला मिळते. या शिल्पामध्ये चतुर्भुजा देवी स्थानक म्हणजे उभी आहे. तिच्या मागच्या हातामध्ये चक्र आणि शंख आहे, डोक्यावर छत्र आहे. एक हात कटावलंबित म्हणजे मांडीवर स्थिरावला आहे, तर दुसऱ्या हाताने ती भक्ताला अभय देत आहे. या शिल्पपटात तिच्या पायाशी असलेला भक्त स्वतःचे शीर देवीला अर्पण करीत आहे. येथे चित्रसूत्रात सांगितल्याप्रमाणे भक्ताच्या त्याग भावनेतून करुण रस उद्भवलेला दिसतो, ज्यामुळे देवी त्याला दर्शन देण्यासाठी प्रकट झाली आहे.
पुढील भागात देवी शिल्पातील रौद्र रसाचा परामर्श घेऊया.
8 thoughts on “करुण रस – त्रिपुरा : नवरस आणि देवी शिल्पे”