रससिद्धांतामध्ये शृंगार, हास्य आणि करुण रसानंतर येतो तो म्हणजे रौद्र रस. या रस निष्पत्तीचा स्थायीभाव क्रोध आहे. त्यामुळे रौद्ररस अभिव्यक्त होताना उत्साह, आवेग, चपळता, उग्रता आणि रोमांच हे संचारीभाव दिसतात. रौद्र रसाची व्याख्या करताना भरतमुनी त्यांच्या नाट्यशास्त्रामध्ये रौद्र रसाची कर्मे म्हणजे या रसामुळे काय काय होते हे पुढील श्लोकातून व्यक्त करतात –
ताडनपाटनपीडनच्छेदनप्रहरणशस्त्र – सम्पातसम्प्रहाररुधिराकर्षणाद्यानि कर्माणि
ताडन म्हणजे शरीरावर प्रहार करून मारणे, पाटन म्हणजे तुकडे तुकडे करणे, पीडन म्हणजे दाबणे, छेदन म्हणजे एकमेकांपासून वेगळे करणे या सर्व कर्मांमध्ये रौद्र रसाचा अंतर्भाव आहे.
देवी शिल्पामध्ये अश्याच क्रोधात्मक रौद्ररूपाचे दर्शन होते, ते तिच्या काली या स्वरूपात. देवीचे काली स्वरूपातील शिल्प आणि त्यातील रौद्र रस अनुभवण्यापूर्वी तिचे स्वरूप आणि उद्भव बघणे अधिक संयुक्तिक ठरेल. देवी कालीचे स्वरूप मार्कंडेय पुराण, लिंगपुराण, देवी भागवत यांसारख्या पुराणांमधून तर तंत्र साहित्यातून अधिक स्पष्ट होते. पार्वतीचे उग्र स्वरूप म्हणजे काली. काळावर तिचे अधिराज्य आहे म्हणून तिला काली म्हणतात.
कालसङ्कलनात् काली सर्वेषामादि रूपिणी |
कालत्वादादिभूतत्वादाद्या कालीति गीयते ||
म्हणजेच काली देवी, तिच्या ठायी काळाचे संकलन करते. तिच अंत आणि तीच आरंभ स्वरूपिणी आहे. कालत्व अर्थात ज्या गुणांचा स्वीकार करून काल उत्पन्न होतो, तो गुण तिच म्हणजे काली. काळाचा प्रारंभही तिच्यापासून होतो त्यामुळे तिला आद्या असेही म्हणतात.
काली उत्पत्तीच्या विविध कथा आहेत. देवीचे दशम महाविद्या स्वरूपात ही पूजन होते. परंतु देवी कालीचा रौद्र हा स्थायीभाव, मार्कंडेय पुराणातील देवी महात्म्यात वर्णिला आहे.
ततः कोपं चकारोच्चैरम्बिका तानरीन्प्रति |
कोपेन चास्या वदनं मषीवर्णमभूत्तदा ||
भृकुटीकुटिलात्तस्या ललाटफलकाद्द्रुतम् |
काली कराल वदना विनिष्कानतासिपाशिनी ||
चण्ड-मुण्ड यांच्या असुरी सेना देवीवर धनुष्य ताणून उभी आहे, हे बघून अंबिकेचा चेहरा रागाने काळा पडतो, तिच्या भुवया क्रोधाने चढतात आणि त्यातून साक्षात कालीचा उद्भव होतो. तिचा चेहरा काळा आणि हातामध्ये खड्ग आणि खट्वांगं धारण केलेले असे उग्र रूपात ती असुरांपुढे येते.
शिल्पकाराने देवी कालीची अनेक रौद्र रूपे शिल्पांमधून अभिव्यक्त केली आहेत. युद्धभूमीवर तिच्या रौद्र रूपाने थैमान घातले आहे. त्यामुळे तिचा युद्धभूमीवरील हा रौद्र तांडव नृत्यशिल्पांतून अभिव्यक्त होतो. कर्नाटक, हळेबिड येथील होयसाळेश्वर मंदिरावर रौद्ररुपिणी कालीचे शिल्प बघायला मिळते. हे शैव मंदिर इ.स. 12 शतकात होयसळ राजवंशातील विष्णूवर्धन याने बांधले आहे. होयसळ शैलीतील या शिल्पामध्ये षड्भुजा काली नृत्य करताना दिसत आहे. तिच्या आजूबाजूला तिचे सेवक, गण आहेत. खड्ग, सर्प, डमरू, त्रिशूळ, कपाल आणि नरमुण्ड तिच्या हातांमध्ये तिने धारण केले आहे. सालंकृत कालीच्या गळ्यातील रुण्डमाळा रुळत आहे. क्रोधाने तिचे डोळे विस्फारलेले आहेत. एकूणच चेहऱ्यावरील रौद्र भाव सहज टिपता येत आहे. त्यामुळे रौद्र रसातील तिच्या या शिल्पातून उत्साह, आवेग, चपळता, उग्रता यांचे दर्शन होत आहे.
पुढील भागात देवी शिल्पातील वीर रसाचा परामर्श घेऊ.
7 thoughts on “रौद्र रस – काली : नवरस आणि देवी शिल्पे”