महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण शैव क्षेत्र असलेल्या औंढ्या नागनाथ मंदिराच्या जंघाभागावरील एक नटराज प्रतिमा आज बघणार आहोत. औंढ्या नागनाथ मंदिर द्विजंघायुक्त असल्याने शिल्पवैभवाने संपन्न असे हे मंदिर आहे. या मंदिराचा अभ्यास करीत असताना याच्या जंघा भागावर एकूण चार नटराज प्रतिमा मला नोंदवता आल्या आहेत. त्यापैकी एक अत्यंत सुंदर अशी प्रतिमा आज बघणार आहोत.
मंदिराच्या खालाच्या म्हणजे प्रथम जंघा भागात, दक्षिण दिशेकडील बाह्यांगावर असलेली ही नटेश्वराची अत्यंत महत्त्वपूर्ण प्रतिमा आहे. शिवाच्या या वैश्विक नृत्याचे दर्शन या शिल्पामधून होते. या विग्रहामध्ये नटेश्वर षोडशभुज म्हणजे सोळा हातांचा असून त्याच्या हातामध्ये अभयमुद्रा, भग्नावस्थेत असलेले त्रिशूल, शंख, एका हातातील आयुध भग्न आहे, वज्र, डमरू आणि मागच्या दोन हातांमध्ये सर्प धारण केला आहे. डाव्या हातामधील आयुधे भग्नावस्थेत असल्याने आयुधांचा आढावा घेता येत नाही, परंतु पुढचा हात हा करीहस्त मुद्रेत आहे. सर्वाभरणभूषितम् म्हणजे सर्व अलंकारांनी युक्त असे हे नटराज स्वरूप आहे. शिवाच्या डोक्यावर सुंदर जटामुकुट आहे. हा मुकुट छोट्या कवट्यांनी सुशोभित केला आहे. कानांमध्ये सर्पभूषणे आहेत. गळ्यात रत्नजडित ग्रेवेयक आहे. डाव्या खांद्यावर गोल मणी किंवा रुद्राक्षाचे यज्ञोपवीत रुळत आहे. दंडामध्ये असलेल्या मण्यांच्या केयुरामध्ये सिंहमुखाचे अलंकरण आहे. हातांमध्ये कंकण आहे. पायांमध्ये पादकटक आणि पादवलय आहेत. कटीवस्त्र हे तलम शेल्याने बांधून त्याचा सोगा हा नृत्याच्या लयीमध्ये हेलकावे खात आहे. शिवाच्या पदन्यासाचा विचार केला तर मण्डल स्थानामधील शिवाने डावा पाय कमरेपर्येंत उचलून ऊर्ध्वजानु करण साधले आहे.
या शिल्पामध्ये शिवाच्या या दिव्य नृत्याला संगत करण्यासाठी ब्रह्मदेव आणि भगवान विष्णूही वाद्यांचा ताल देत नृत्य करीत आहेत. विशेष म्हणजे ब्रह्मदेव आणि विष्णू दोघेही मृदुंगम् हे तालवाद्य वाजवत आहेत. शिवाच्या उजव्या पायाजवळ ब्रह्मदेव तर डावीकडे विष्णू आहे. ब्रह्मदेव आणि विष्णू दोघेही चतुर्बाहु असून त्यांच्या पुढच्या दोन हातांनी ते मुदुंग वादन करीत आहेत. मागच्या दोन हातांमध्ये ब्रह्माने स्रुक आणि पुस्तक धारण केले असून विष्णूच्या मागच्या दोन हातांमध्ये शंख आणि चक्र ही आयुधे आहेत. ब्रह्मदेवाचा उजवा पाय भग्नावस्थेत आहे. विष्णू भगवान स्वस्तिक पदन्यासात शिल्पीत केले आहेत. शिवाच्या डाव्या पायाशी त्याचे वाहन वृषभ विराजमान आहे. आपली मान उंचावून वृषभही या दिव्य नृत्याचे अवलोकन करीत आहे.
ज्याप्रमाणे नाट्य आणि नृत्य या कलांमध्ये शिवाचे नटराज स्वरूप पूजनीय आहे, त्याचप्रमाणे दार्शनिकदृष्ट्या शैव साधकांच्या, योगीजनांच्यादृष्टीने नटराज हे तत्त्व महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने ही नटराज प्रतिमा अलौकिक आणि महत्त्वपूर्ण आहे.
छायाचित्र – © धनलक्ष्मी म. टिळे
(पूर्वप्रकाशित – श्रावण कृष्णपक्ष चतुर्थी शके १९४४.)