ऋग्वेद काळापासून शिव देवतेच्या संकल्पनेच्या विकासातील रुद्राचे दैवतशास्त्रीय स्वरूप, शिवाय नमः या लेख शृंखलेचा पहिला भाग रुद्राय नमः मध्ये बघितले. दुसऱ्या भागात, याच रुद्राने त्रिपुरांचा विनाश करणारा त्रिपुरान्तकाय नमः हा लेख आपण बघितला. आज शिवाचे, उमेसोबत परिवार देवतेत होणारे रूपांतरण बघणार आहोत.
शिव अर्धांगिनी उमा म्हणजेच पार्वती. हिमवान आणि मेना यांची कन्या पार्वती आणि शिव यांचा विवाह होतो आणि उमा, त्या महेश्वराची पत्नी होते. शिवतत्त्व हे या मनुष्यरूपी उमापेक्षा खूप भिन्न आहे. उमेचा जन्म शिवतत्त्वाशी एकरूप होण्याकरिता योजला होता. पूर्वजन्मात दक्ष कन्या सती आणि मग तीच पार्वती रूपात पुन्हा जन्म घेऊन शिवपत्नीत्व स्विकारते. शिवा आणि शिव यांच्या एकत्वाची साक्ष अर्धनारीश्वर स्वरूपात साकार होते. पण उमा महेश्वर मूर्तीत उमेचे स्वतंत्र अस्तित्व जे शिवाशी जोडले जात आहे अश्या स्वरूपात साकार होते. उमा महेश्वर म्हणजे संपूर्ण सृष्टीतील दैवी तत्त्व आणि त्या तत्त्वाशी संधान बांधणाऱ्या मानवी भावभावनांच्या मुग्धतेचे मूर्त रूप आहे. एक असा अनुबंध जो सृष्टीतील चैतन्य साकार करतो.
उमा महेश्वराच्या अश्या अलौकिक प्रेमबंधाला शिल्पकारांनी शिल्पांमध्ये तर कवींनी काव्यबद्ध केले आहे. महाकवी कालिदासरचित कुमारसंभव हे माधुर्ययुक्त काव्य पार्वती-परमेश्वराला समर्पित आहे. चंद्रशेखर रूपातील राजस शिव, कोमलकांती हैमावतीचे पाणिग्रहण करतानाची, कल्याणसुन्दर मूर्ती या दोघांच्या मनातल्या मदनरंगाचे सुंदर चित्रण साक्षात समोर उभे करते. चंद्रशेखर शिव मूर्तीच्या विविध छटा या केवल चंद्रशेखर, कल्याणसुन्दर मूर्ती, उमासहित चंद्रशेखर, आणि सोमस्कंद मूर्तींमध्ये साध्य होतात. परंतु उमा-महेश्वर आलिंगन मूर्ती शिव-पर्वतीमधल्या दिव्य प्रेमाची अभिव्यक्ती करणारी मूर्ती आहे.
उमा महेश्वराचे प्राचीन अंकन, कुषाण राजा कनिष्क याचा वारस, हुविष्कच्या नाण्यावर येते. डॉ. मधुकर ढवळीकर यांच्या भारतीय नाणकशास्त्र मध्ये शिव आणि उमा यांची हुविष्कच्या नाण्यावरील अंकनाबद्दल माहिती मिळते. या नाण्याच्या दर्शनी बाजूस शिरस्त्राण आणि अलंकारांनी युक्त राजाचा अर्धपुतळा आहे. त्याच्या हातामध्ये राजदंड आहे. नाण्याच्या कडेने ग्रीक लिपीमध्ये शावनानो शाओ उएष्की कोशानो असा लेख आहे. दुसऱ्या बाजूस, शिव आणि उमा एकमेकांच्या समोर उभे आहेत. शिवाच्या मागे प्रभावलय आणि डोक्यावर जटाभार आहे. अंतरीय नेसले असून शिव चतुर्भुज आहे. डाव्या हातामध्ये त्रिशूळ, मृग (?) आणि उजव्या हातामध्ये अंकुश आणि कमंडलू आहे. उमेने ग्रीक पद्धतीचा वेश परिधान केला असून ती द्विभुज दाखवली आहे.
म्हैसूरचे राजा कृष्णराजा 3 ओडेयर इ.स. 1799–1868 यांच्या नाण्यावर उमा महेश्वर आलिंगन मूर्तीचे अप्रतिम अंकन आहे. शिव सव्य-ललीतासनात बसले असून उमा त्यांंच्या मांडीवर आसनस्थ झाली आहे. मागे शिवाकडे त्रिशूल आहे आणि उमेच्या बाजूस एका मृगाचे अंकन आहे. या नाण्याच्या दुसऱ्या बाजूवर श्री कृष्णराजा हा लेख आहे.
डॉ. नि. पु. जोशी यांच्या भारतीय मूर्तीशास्त्र यात गुप्तकालीन शिव-पार्वतीची मूर्ती मथुरा संग्रहालयात असलेल्या मूर्तीचा उल्लेख आहे. तसेच कुमारगुप्ताच्या काळातील अभिलेखीत मूर्ती कौसंबी इथे सापडल्याची नोंद आहे. या दोनही मूर्ती आलिंगन मुद्रेत नसून केवळ जवळ उभ्या आहेत. शिवाच्या डाव्या हातामध्ये कमंडलू आहे. उजव्या हातामध्ये अक्षमालेसह अभय मुद्रा आहे आणि उमेच्या हातामध्ये दर्पण आहे. डॉ. गो. बं. देगलूकर यांच्या शिवमूर्तये नमः मधेही उमा महेश्वर आलिंगन मूर्तीचे विवेचन येते.
शिल्पशास्त्र अश्या मूर्तीचा निर्माण करण्याचे निर्देश सांगते ते असे-
उमामहेश्वरं वक्ष्ये उमया सह शङ्कर |
मातुलिङ्गं त्रिशुलश्च धरते दक्षिणे करे ||
आलिङ्गीतो वामहस्तें नागेन्द्रं द्वितीये करे |
हरस्कन्द उमाहस्ते दर्पणो द्वितीये करे || (रूपमंडन – 28)
पत्नी उमा, शंकरासोबत आहे. ज्याच्या उजव्या हातामध्ये मातुलिंग आणि त्रिशूल आहे. डाव्या हाताने उमेला आलिंगन दिले आहे आणि दुसऱ्या हातामध्ये नागेंद्र आहे. उमेचा एक हात शिवाच्या स्कंदावर (खांद्यावर) स्थिरावला आहे आणि तिच्या दुसऱ्या हातामध्ये दर्पण आहे.
शिल्पकलेतील काही अंकनात उमा आणि महेश्वर त्रिभंग स्थितीत उभे असतात. बऱ्याचदा महेश्वर सव्य-ललीतासनात बसलेले आणि त्यांच्या डाव्या मांडीवर उमा बसलेली दाखवतात. कधी ते नंदीवर आरूढ असतात तर कधी शिवाच्या पायाशी नंदी आणि उमेच्या पायाशी सिंह किंवा गोधा (घोरपड) दाखवतात. शिव चतुर्भुज असून त्याच्या हातामध्ये मातुलिंग किंवा अक्षमाला, त्रिशूळ आणि सर्प असतो. एका हाताने त्याने उमेला आलिंगन दिलेले असते. उमेचा एक हात शिवाच्या खांद्यावर असतो आणि दुसऱ्या हातामध्ये दर्पण किंवा उत्पल असते. क्वचित उमाही चतुर्भुज अंकित केलेले असते. या अश्या अनेक मूर्ती सध्या भग्नावस्थेत आहेत. तरीही या पाषाणांच्या अंतरातले लालित्य शिल्पकाराने साकारलेले होते याची निश्चितच जाणीव होते. काही मूर्तीमध्ये शिव त्याच्या हाताने सलज्ज उमेच्या हनुवटीला हलका स्पर्श करून तिचा चेहरा वर उचलत आहे असे दिसते. उमा महेश्वराच्या लोचनांचे झालेले मिलन होऊन त्यांना पडलेला सृष्टीचा विसर या शिल्पांतून दिसतो. अश्याच उमा महेश्वर मूर्तींच्या अद्वितीय प्रेमाचे साक्षात दर्शन आपल्याला मथुरा, नाचणा, लातूर येथील निलंगा, नांदेड येथील कंधार, घारापुरी, वेरूळ, पट्टडकल आणि उत्तरेपासून अगदी दक्षिण भारतापर्येंत सर्वत्र असंख्य ठिकणी घडत राहते. शिवपार्वतीच्या मुग्ध स्नेहाचे, उमामहेश्वराय नमः हे स्वर काव्यातून, नाणी आणि शिल्पांसारख्या भौतिक साधनांमधून सतत मधून उमटत राहतात.
खूप छान माहिती…
माधुरी,
धन्यवाद.. प्रत्येकच लेख तू आवर्जून वाचतेस आणि मला प्रतिक्रिया पण देतेस. तुझे मनापासून आभार.. बोधसूत्र ब्लॉग अशीच वाचत रहा आणि प्रतिक्रिया कळवत रहा आवडल्यास लेख Share ही कर.
अर्थात .. धनु, इतके माहितीपूर्ण लेख कुणाला आवडणार नाहीत? तुझा अभ्यास दिसतो.
धन्यवाद माधुरी 🙂