Category: अतिथीसूत्र

  • प्राचीन भारतीय चित्रकलेतील रंग

    प्राचीन भारतीय चित्रकलेतील रंग

    सतराव्या शतकातली, हिमाचल मधल्या गुलेर या लहानशा गावातली एक सकाळ. तिशीच्या वयातला तरुण, शिडशिडीत चित्रकार नैनसुख, दगडाळ, तीव्र उताराच्या रस्त्यावरुन मार्गक्रमणा करतो आहे, रावीच्या खळाळत्या, वेगवान पात्राच्या वाहत्या दिशेने. सपाटीवरच्या जसरोटा संस्थानाच्या दरबारात लघुचित्रकार म्हणून रुजू होण्याकरता तो निघाला आहे. राजकीय उलथापालथ, नवे काम मिळवणे अशा अनेक कारणांनी लघुचित्रकार स्थलांतरित होत होते. नैनसुखच्या हातातल्या काठीला लटकवलेली एक पडशी आणि पोटाशी घट्ट कवटाळलेली एक लाकडी पेटी ज्यात त्याचे सर्वस्व आहे. खारीच्या पोटावरल्या केसाचा पातळ कुंचला आणि रंगांची भुकट्या ठेवलेल्या काही लाकडी, काही शंखांच्या डब्या. डब्यांमधे राजवर्ती निळा, हिरवट राखाडी मालकाईट, चमकदार मातकट तपकिरी, जर्द कुशुंबी लाल, उजळ पिवळा, काळाशार अशा रंगांसोबत काही झळाळती सुवर्ण पाने, रजत भस्म सुद्धा आहेत. गुलेरमधल्या आपल्या वडिलांच्या, प्रख्यात लघुचित्रकार पंडित शिऊ यांच्या कारखान्यात कित्येक दिवसांच्या परिश्रमातून, दगडांची चूर्णे, वनस्पतींची पाने-फ़ुले-बिया-मुळ्या, भिजवून, घोटून, खलून, गाळून, धातूवर रासायनिक प्रक्रिया करुन बनवलेले बहुमोल रंग. जायचं ठरलं त्यावेळी त्याने सर्वात प्रथम अतिशय काळजीपूर्वक बांधाबांध केली ती या बहुमोल रंगांची. हे रंग त्याचं आयुष्य आहे. त्याची पुढची, जसरोटाच्या राजा बलदेवरायच्या दरबारातली प्रख्यात लघुचित्रकार म्हणून कारकीर्द गाजणार आहे ती या रंगांच्या भरोशावर. लघुचित्रकाराची वैशिष्ट्यपूर्ण ओळख रंगांच्या वापरातून बनत होती, वापरलेले रंग ही त्या चित्रकाराची एक प्रकारे अलिखित सही होती.

    त्या काळातल्या कोणत्याही लघुचित्रकाराची चित्र, किंवा त्याही आधीच्या काळातील भित्तीचित्र, मंदिर-लेण्यांमधील चित्र असोत, ती पहाताना त्या चित्रकाराने जीवापाड जपलेल्या, कष्टाने बनवलेल्या या रंगांची जादू किती विलोभनीय आहे, आजही किती तजेलदार, टवटवीत आहे ते जाणवतं, मन थक्क होतं. भित्ती-लघुचित्रामधली गोष्ट जाणून घेताना, त्यातल्या लयदार, मनमोहक आकृत्यांचं सौंदर्य न्याहाळताना सर्वात महत्वाची वाटते ती प्राचीन रंगांची किमया. ते रंग नेमके कसे बनले, ती नेमकी छटा मिळवण्याकरता त्या चित्रकारांनी नेमक्या काय क्लुप्त्या वापरल्या, कोणते घटकपदार्थ, तंत्र वापरले इत्यादी बारकावे जाणून घेतल्यावर तर ही जादू आणि आदर शतपटीने वाढते. नैसर्गिक रंगांमधे जास्तीतजास्त झळाळ, दाटपणा, टिकावूपणा, प्रवाहीपणा येण्याकरता विविध प्रयोग केले जात. पक्ष्यांचे, भुंग्यांचे पंख, अभ्रकाचा चुरा, मौल्यवान रत्न, दगडांचे चूर्ण, विविध खनिजद्रव्ये मिश्रित रंगीत माती, गेरु, काव, तुरटी, नीळ, फ़ुलांच्या पाकळ्या, सोने, चांदी..असंख्य गोष्टींचा वापर केला जाई. भारतीय चित्रकलेत रंगांचं खरं वैभव, उधळण पाहिला मिळते लघुचित्रकलेमधे. मग ती पहाडी, बशोली, बुंदी असोत, गीतगोविंद, रागमाला, बनीठनी, मोगल, राजस्थानी.. निळंगर्द मखमली आभाळ, गुलाबी चोचींचे सप्तरंगी पक्षी, कोवळ्या, पोपटी, ताम्रलालस पालवी पासून गर्द शेवाळी, परिपक्व काळसर हिरव्या पानांच्या शेकडो छटा, रसाळ फ़ळे.. 

    उदा. गीतगोविंदातल्या काही लघुचित्रांवरची पिवळट छटा कोणत्या रंगाचा दिलेला हात नाही, तर ती नेमकी छटा सुकलेल्या गोमुत्रामुळे आलेली आहे, वस्त्रांचा दाट केशरी रंग पलाशच्या फ़ुलांचा आहे. कृष्णाच्या मुकुटातला निळा मोरपिशी चमकदार खडा भुंग्याच्या पंखांमधला तुकडा आहे. 

    दहा हजार वर्षांपूर्वीच्या अश्मयुगीन मानवाने भीमबेटकाच्या गुहांमधल्या चित्रांमधे वापरलेले अगदी प्राथमिक मातीचे, दगडांचे पांढरे, लाल, हिरवे, तपकिरी रंग, पाच हजार वर्षांपूर्वीच्या हरप्पन संस्कृतीत मातीच्या भांड्यांवरील नक्षीतले,विलोभनीय लाल काळे रंग चमकदार, त्याकाळातल्या वस्त्रांवर सापडलेला निळा रंग, अजिंठ्यातली रंगांची मोहक आभा, मंदिरांमधील भित्तीचित्रे, धार्मिक चित्रे, वस्त्रांवरील चित्रे, काचेवरील, धातूवरील, कागदावरील, पोथ्यांमधील, लघुचित्रे, लोकचित्रे, निसर्गचित्रे.. भारतीय चित्रकलेच्या इतिहासातली रंगांची खुमारी अवर्णनीय आहे. 

    कुठून आले हे रंग? कोणी बनवले हे रंग?

    भारतीय पर्यावरणातही सर्वात महत्वाचे आहेत ते रंग. निसर्गात, मातीत, माणसांच्या अंगावर, कपड्यांवर रंग आहेत. पाचव्या सहाव्या शतकातल्या अजिंठ्याच्या चित्रांमधे रंगांची मनोहारी उधळण जाणवते, मात्र त्यातले मुळ रंग मोजके आहेत, आणि इतर या रंगांच्या कमी जास्त मिश्रणातून बनलेल्या गडद, उजळ छटांचा कौशल्यपूर्ण वापर केला आहे. हे सर्व रंग वस्त्रगाळ माती, खनिज दगडाच्या चूर्णापासुन बनलेले आहेत. उदा. गेरुपासून बनलेला तांबडा आणि पिवळा रंग, फिकट हिरवा, पांढरा, काळा, निळा, काळा रंग दिव्याची काजळी धरून तयार केलेला आहे. काही वनस्पती पासून तयार केलेले रंग देखील असावेत. लापिज लाजुली या बहुमोल खनिज दगडाचा राजवर्तू निळा रंग हे अजिंठ्याच्या भित्तीचित्रांचे विलोभनीय वैशिष्ट्य आहे, लापिज लाजुली स्थानिक दगड नाही, अफ़गाणीस्तानाशी असलेल्या व्यापारी संबंधांतून तो उपलब्ध करुन दिला जाई, अर्थातच तो बहुमोल होता.  

    रंग हे भारतीय चित्रकलेतलं अत्यंत महत्त्वाचं अंग. वात्सायनाने चित्रकलेची जी षडांगे सांगीतली आहेत त्यात रंगाला प्रमुख स्थान आहे. विष्णूधर्मोत्तर पुराणातील चित्रसूत्रामधे रंग आणि रंगनिर्मितीवर सविस्तर प्रकरणे आहेत. 

    सर्वप्रथम कापड, कागद, दगड असा आपल्या चित्रांकरता योग्य पृष्ठभाग निवडून त्यानुसार रंग निवडीची प्रक्रिया सुरु होत असे.  कारखान्यातील चित्रकारांचे कौशल्य, अनुभव, अभ्यास, तंत्रक्षमता याकरता पणास लागे. प्रत्येक चित्रकाराची आणि त्याच्या हाताखाली तयार होणा-या शिष्यवर्गाची रंगनिर्मितीची आपापली एक खासियत होती. एका परीने चित्रकारांचे ’घराणे’ त्यानुसार ठरे. स्थान, दरबार, समाज, परंपरा यांना महत्व देऊन त्यानुसार चित्रांचा विषय आणि रंगांची निवड ठरवण्यात येई. प्राचीन परंपरेतून आलेली रंगनिर्मितीची कला आणि काही नवे प्रयोग त्याकरता वापरले जात. रंगांकरता नैसर्गिक साहित्याचा वापर केला जाई कारण बहुतांशी त्यावाचून पर्यायही नव्हता. 

    पलाश आणि इतर लाल रंगांची फ़ुले वाटून, मंजिष्ठा, त्यात इतर झाडांच्या मुळ्या उकळवून मिळवलेला लाल, केशरी रंग, अधिक गडद छटेकरता, म्हणजे लाल तपकिरी रंग मिळवण्याकरता मेंदीची पाने वापरली जात. वाळूत उगवणा-या फ़ळांच्या बिया दळून त्यात अरबी समुद्राजवळच्या होर्मुझ बंदरातली माती मिसळून बनवलेला जांभळा, हळदीपासून पिवळा, निळ्या रंगाकरता अफ़गाणीस्तानातल्या बदकशान खाणीतील लापिज लाजुली उर्फ़ राजावर्त या बहुमोल दगडाचे बारीक चूर्ण वापरले जाई. रंगांच्या गडद, फ़िक्या छटांकरता त्यात पक्ष्यांची विष्ठा, चूनखडी इत्यादी मिसळले जाई.  

    लघुचित्रांच्या काठावरील नक्षीमधे सोन्याच्या वर्खाचा वापर करण्याची पद्धत लघुचित्रशैलीसोबतच पर्शियावरुन आली होती. लाखेपासून बनवलेले रसायन (व्हार्निश) जे पिवळट लाल रंगाचे असे, तेही लघुचित्रांमधे, तसेच भित्तीचित्रांमधे वापरले जाई. पाण्यात मिसळल्यावर त्याला निळसर छटा येत असल्याचाही उल्लेख आढळतो. तेलांमधे खलायचे, पाण्यात मिसळायचे, वृक्षांच्या चिकांमधे मिसळून वापरण्याचे रंग वेगवेगळ्या गुणधर्मांचा परिणाम देत. 

    चित्रसूत्रामधे रंगाची संकल्पना वर्गवारी, वापर, गुणधर्म यांची तपशिलवार चिकित्सा आहे. वेगवेगळ्या छटांची निर्मिती, रंगाच्या वापरातून खोलीचा आभास कसा साधायचा, बारीक नक्षीकाम कसं करायचं, रेखाकृतींमधे रंग भरुन आकार कसा उत्पन्न करायचा याचे वर्णन आहे.  “चित्रातील रेखाकृतींच्या कौशल्याने गुरु समाधानी होतो, प्रकाश-सावलीच्या खेळामुळे उच्च दर्जाचा रसिक लोभावतो, स्त्रिया कलाकुसरीने मोहीत होतात, तर रंगांच्या समृद्धीमुळे सामान्य रसिक आनंदित होतो.” असं त्यातील एका संस्कृत वचनामधे मांडलं आहे.

    रंगांना चित्रकलेत अतिशय महत्वाचे स्थान आहे, चित्राचा तो अविभाज्य भाग आहे. त्यामुळे रेखाकृतीला जिवंतपणा येतो. “ज्यावेळी कुशल चित्रकार सुवर्णासारख्या झळझळीत रंगाचा वापर कौशल्याने करतो, आणि मृदू रेषांनी वस्त्रांमधे रंग भरतो, सौंदर्य, समतोल, ताल आणि उर्जा यांचा रंगांशी योग्य मेळ साधतो, त्यावेळी चित्राला ख-या अर्थाने सुंदरता लाभते.” असं चित्रसूत्रात म्हटले आहे.

    चित्रांमधली सहा अंगे- ज्यात वर्णिका-भंग हे एक आहे, त्यामधे रंगांचे वैविध्यपूर्ण मिश्रण, मेळ, छटा आणि वर्ण यांचे वर्णन आहे. त्यात इतर अनेक गोष्टींसोबत, नाजूक आणि कौशल्यपूर्ण रित्या केलेला कुंचल्याचा आणि इतर रंगसाधनांचा वापर कसा करावा याचे वर्णन आहे. चित्रकाराचे तंत्रावरील, रंगलेपनावरील प्रभुत्व केवळ अनुभवाअंती प्राप्त होते असा त्यात उल्लेख आहे. 

    रंग हा चित्रांचा अविभाज्य भाग आहे; भावना आणि मनस्थिती हे रंगाच्या योग्य वापरातून, त्यांची घनता, छटा, उजळपणा, रंगरेषेची जाडी-पातळपणा, गडदपणा यातून दाखवता येणे शक्य आहे. कल्पकता, कुशलता आणि हुषारीने रंगाचा वापर करताना चित्रकाराला आपल्या मर्यादांची जाणीव असायला हवी अशी खबरदारीही त्यात आहे. सूत्र-पट-रेखा ही बाह्याकारातली पहिली रेषा आणि शुभवर्ती रेखा ही चित्राचे रेखाटन पूर्ण झाल्याचे दर्शवणारी रेषा, चित्रांमधे रंग भरायला सुरुवात करण्याची ही खूण. रंगांचा पहिला थर हा पातळ असायला हवा (विरल विलेपन) आणि त्यानंतरच त्यात वर्तन म्हणजे सघनता आणता येते.  

    वर्णक्रमामधे चित्रामधील रंगयोजनेचा विचार आहे, छटांच्या मेळातून रंगांचे समायोजन कसे साधावे. हिरवा, पिवळा आणि मग इतर (वर्णक्रमो हरित, पित आदी वर्ण-विन्यास). वर्ण-स्थिती मधे चित्रातले रंगाचे योग्य स्थान. योग्य जागी योग्य रंग चित्रामधे असणे गरजेचे आहे, निदान रंगलेपनाच्या सुरुवातीला, ज्यावेळी एका रंगावर दुस-या रंगाचे लेपन, विरुद्ध रंगलेपन, समतोल, छटा आणि इतर गोष्टी ठरवायच्या असतात. त्यानंतर रंगरेखनातली सफ़ाई, मिश्रण इत्यादी जे योग्य वेळ आणि स्थिती साधून करणे गरजेचे. 

    रंगाची प्रतिकात्मकता आणि सूचन

    चित्रांमधे रंगांच्या वापराला सांकेतिक महत्व आहे. रंगांमुळे रेखाटनाला वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व मिळते आणि चित्राचा स्वभाव, मनस्थिती तपशिलवार विषद करता येऊ शकते. चित्रांमधले सत्व, रज, तामसी गुण रंगांमधून प्रतित होतात.

    काही विशिष्ट वैश्नव परंपरेमधे, राधा, जी प्रेम आणि सौंदर्याचे मूर्तिमंत प्रतिक आहे, तिला तिच्या प्रिय रंगांमधे रंगवले जाते, म्हणजे कृष्णाचा मोहक निळा, आणि कृष्णाच्या अंगावर चमकदार सुवर्णतेजाची झळाळी असणारे पितांबर असते, जो राधेचा रंग आहे, त्यातून सान्निध्याचे प्रकटीकरण होते, म्हणजे राधा-कृष्णाचे परस्परांमधे मिसळून जाणे.  

    रस-चित्र, भावनादर्शक चित्रे, त्याला वर्ण्यलेख्य असेही म्हटले आहे, ज्याचा अर्थ रंगांच्या अर्थाची अभिव्यक्ती. वास्तवदर्शी चित्रांहून ही वेगळी मानली गेली आणि केवळ रंगांच्या माध्यमातून भावनाअभिव्यक्ती होणे महत्वाचे मानले. या प्रकारच्या चित्रांमधे प्रत्येक रसाकरता विशिष्ट रंगाची निवड. उदा. शृंगार रसाकरता श्यामवर्ण (हलका आकाशी वर्ण), हास्य रसाकरता श्वेतवर्ण, करुणा रसाकरता राखाडी, रौद्र रसाकरता लाल, वीररसाकरता पिवळट पांढरा, भयानक रसाकरता काळा, अद्भुत रसाकरता गडद पिवळा, आणि बिभत्स रसाकरता निळा रंग. 

    पौराणिक चित्रांमधले रंग, प्रतिकात्मकता वेगळी आहे. सर्वोच्च गुण असलेल्या पवित्र देवतेला आकाशी रंग, त्यातून त्याचे अपरिमित अवकाश व्यक्त होते, शिव गौरांग असलेला, जवळपास पारदर्शी, विरंगी व्यक्तिमत्वाचा, हनुमान आणि गणेश रक्तवर्णी,प्रचंड उर्जा, उत्साह आणि जीवनाचे प्रतिक; कालीमातेचा काळा रंग हा सर्व रंगांचा समुच्चय, अवकाशातील सर्व उर्जेचे एकत्रीकरण त्यात आहे. 

    रागमाला चित्रांमधे रंगांमधली भावनोत्कटता, आवेग ख-या अर्थाने दृश्यात्मकतेकरता वापरला गेला. प्रत्येक रागाचे व्यक्तिमत्व विशिष्ट रंग, स्वभाव आणि वातावरणातून व्यक्त होते. नायक-नायिकेद्वारे. कोणता ऋतू, दिवस अथवा रात्रीचा कोणत्या प्रहरी हा राग गायला जातो त्यानुसार हे ठरवले जाते. रागाचा स्वभाव, संदर्भ त्यातून व्यक्त होते. कला, रंग, काव्य, संगीत या सर्वांची मनमोहक अभिव्यक्ती रागमालेतून होते.      

    चित्रसूत्रामधले रंग

    प्राथमिक रंग आणि त्यांचे उपप्रकार:
    चित्रसूत्रात मुळ वर्ण (रंग) पाच सांगीतले आहेत, श्वेत, पित, कृष्ण, हरित आणि रक्त. तर इतर ठिकाणी फ़क्त चार (लाल, पिवळा, निळा, पांढरा); मात्र पांढरा रंग दोन्ही ठिकाणी प्राथमिक आहे.
    पिवळ्या सहित चार रंगांची कल्पना गोरोचना; शुभ्र चंदनी, केशरी, गडद कस्तुरी, रत्नवर्णिय छटा असलेले, नीलवर्णी, हिरण्यवर्णी, माणिक, गोमेद. 
    निसर्गामधे जितक्या रंगछटांचे अस्तित्त्व आहे तितके रंग निर्माण करणे ही चित्रकाराच्या रंगलेपनाच्या कौशल्याची कसोटी आहे असे चित्रसूत्रात म्हटले आहे. मात्र रंगमिश्रण हे नैसर्गिक दिसायला हवे, त्यात भडकपणा नको.  

    चित्रसूत्रामधे रंगलेपनाच्या चार पद्धती सांगीतल्या आहेत त्या अशा- निसर्गाचे यथादर्शी चित्रण, अचूक मापन पण वस्तुचा अवास्तव मोठा आकार, कृत्रिम गुण आणि वस्तुचे पर्स्पेक्टीव, तिन्हीचे मिश्रण शुभ्र, गौर रंगाच्या पाच छटा- श्याम वर्णाच्या बारा छटा सौम्य गौर- सुवर्णवर्णी रुक्म, हस्तिदंती, स्फ़ुट चंदन गौरी, शारदीय घनासारखा शुभ्र, शारदीय चंद्रिकेसारखा गौर , मानसोल्लासात शुभ्र रंगाकरता दूध, मोती, चांदी, चांदणे, शंख, काश्यपशिल्प, फेसासारखा शुभ्र, चंपक आणि कर्णिकर फ़ुलांसारखा, लिंबासारखा कांतिमान श्याम वर्णीय रंगछटा या शुभ्र रंगामधे इतर रंग मिसळून तयार होतात, उदा. रक्त-श्याम, मुद्ग-श्याम (लालसर तपकिरी), दुर्वांकुर-श्याम, पंडू-श्याम, हरित-श्याम, पित-श्याम, प्रियांगु-श्याम, कपि-श्याम (माकडाच्या तोंडासारखे लाल), निलोत्पल-श्याम (निलकमलासारखे), चाश-श्याम (चाश पक्ष्यासारखा फ़िकट निळा), रक्तोत्पल-श्याम, घन-श्याम. वस्तुला विशेषत्व आणि दिशा ही रंगाच्या योग्य, अचूक वापराने येते. 

    निळा रंग तीन प्रकारचा- ज्यामधे श्वेत प्रबळ आहे, श्वेत किंचित आहे, किंवा सम प्रमाणात आहे. निळ्यामधून हिरवा, निळ्याचे प्रमाण किती त्यावर रंगछटा अवलंबुन. निळ्यामधे काळा आणि लाल मिसळून निल-लोहित वर्ण, निळ्याचा ठिपका असलेला पिवळा आणि पांढरा असंख्य रंगछटा निर्माण करतो. 

    “दुर्वांकुराचा हिरवा, बेलफ़ळासारखा पिवळा, मुदगासारखा गडद तपकिरी रंग वापरुन सुंदर चित्र निर्माण करता येते.”

    मानसोल्लासामधे आणि काश्यपशिल्पामधे- लाल शिसे (दरदा), जांभळा (सोन), लाखेचा रस (अलक्तरस), रक्त, मृदू-रक्त, लोहित याबद्दल सविस्तर लिहिले आहे. लाल आणि रक्तवर्ण कमळासारखे चित्र तेव्हाच सुंदर दिसते ज्यावेळी त्यात शुभ्र लाख वापरली जाते, चित्रांवर लाख आणि रेझिनचा थर द्यायला हवा अशी त्यात सूचना आहे.

    काश्यपशिल्पामधे पिवळ्याचे चार प्रकार सांगीतले आहेत-: सुवर्ण, पित, हरिद्र (हळदी), कमलतंतुसारखा (पिसांग)

    काळ्याकरता काश्यपशिल्पामधे चार छटा: निल घनासारखा, जंगलातल्या कावळ्यासारखा श्याम मोरासारखा काळा, भुंग्यासारखा कृष्ण. बाणाने त्यामधे म्हशीसारखा हलका काळा, माकडासारखा काळतोंड्या, गडद काळा, काळोख्या रात्रीसारखा दाट काळा. 

    रंग योग्य ताल आणि सूर चित्रामधे निर्माण करतात. योग्य वापर आणि अचूकता आणि रंगछटेचा समतोल महत्त्वाचा. 

    रंगद्रव्ये खनिजांपासून, पाने-फ़ुले-कळ्या-बिया-मुळ्या इत्यादींपासून बनलेली, म्हणजेच वनस्पतीजन्य असत. सुवर्ण, रजत, ताम्र, अभ्रक, राजावर्त, सिंदुर, हरितल- झळझळीत पिवळा, आर्सेनिक सल्फाईड खनिजापासून बनलेला, चुनखडी, लाख, हिंगुळ, मंजिष्ठा, नीळ  इत्यादी रंगद्रव्यांचा उल्लेखही विपुल आढळतो. सर्व रंगद्रव्यांमधे सिंदूर सर्वात आकर्षक रंगद्रव्य असल्याचाही विशेष उल्लेख आहे. 

    लोह किंवा इतर धातूचा रंगप्रक्रियेमधे कसा वापर करुन घेता येतो याचेही मार्गदर्शन आहे. धातूचा पातळ पत्रा करुन, तसेच त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया करुन तो रंगाकरता उपयुक्त करुन वापरता येतो.

    रंग बनवताना रंगद्रव्यांना प्रथम दगडी खलामधे अथवा खळगा असलेल्या लांब पाट्यावर दीर्घ काळ सावकाश खलून त्याचे वस्त्रगाळ चूर्ण बनवले जाई. त्यानंतर पाण्यामधे गोंद मिसळून त्यात ते चूर्ण एकत्र केले जाई. मग ते गाळले जाइ. मातीचा एकही कण, गढूळ द्रव्ये त्यातून दिसेनाशी होईपर्यंत ही गालण्याचॊ प्रक्रिया चालू राही. त्यानंतर पाणी अलग करुन हा रंग सुकवला जाई आणि त्याचा गोळा बनवून ठेवला जाइ. गरज असेल त्यानुसार सुकलेला गोंद पाण्यात मिसळून मग त्या चिकट द्रवामधे बोटांच्या अथवा अंगठ्याच्या साहाय्याने थोडा रंग खलला जाइ. हवी तितकी प्रवाहिता आणि घनता मिळाली की रंग चित्रामधे लावण्याकरता सिद्ध होई. या प्रक्रियेत रंगाला घट्टसर पेस्टचे स्वरुप आले असे. अंगठ्याने दाब देऊन रंगाला योग्य ती घनता आणण्याच्या या प्रक्रियेला “टेम्परिंग” म्हणतात, त्यातूनच टेम्पेरा पद्धत प्रचलित झाली. 

    प्रत्येक देशात असे काही ना काही, वैशिष्ट्यपूर्ण स्थानिक साहित्य उपलब्ध असते, जेव्हा नसेल तेव्हा व्यापारी मार्गाने ते उपलब्ध करुन घेतले जाई. 

    काश्मिर प्रांतामधले लघुचित्रकार विशिष्ट झ-याचे नैसर्गिक खनिजमिश्रित पाणी साठवून ते सुकल्यावर खाली जे क्षार उरतात त्यांचा वापर रंगामधे करतात. 

    ब्रशकरता मेंढी, उंट, खार, मुंगूस यांचे केस वापरले जातात.   

    वस्त्रांवरही चित्रनिर्मिती मोठ्या प्रमाणावर होत होती, त्यामुळे कापड रंगवण्याच्या प्रक्रियेचाही तपशिल दिलेला आहे. चित्रकारांनी वस्त्र रंगवण्याचे तंत्र विकसित केल्याचा फ़ायदा हातमागावरच्या विणकरांना झाल्याचा उल्लेख आहे.  

    सोन्याचा पातळ पत्रा (वर्ख) आणि भुकटी दोन्हीचा विपुल वापर चित्रनिर्मितीमधे होत होता. शुद्ध सोनं महाग असल्याने, अत्यंत काळजीपूर्वक दगडी पाट्यावर तुंड या उपकरणाच्या साहाय्याने त्याचे चूर्ण बनवण्याची प्रक्रिया कुशल रंगकर्मीकडे सोपवण्यात येई. या उपकरणाच्या अग्रावर विराना गवताचे दर्भ रोवलेले असे. सुवर्णाची भुकटी ताम्रपात्रामधे ठेवून उच्च उष्णतेखाली ती वितळवली जाई. त्यात वेळोवेळी पाणी ओतून घोटले जाई. त्यानंतर वरचे पाणी काळजीपूर्वक बाजूला केल्यावर खाली घन स्वरुपातली सोन्याची भुकटी शिल्लक उरे जिचे तेज उगवत्या सूर्यासारखे झळाळते असे. सुवर्णाच्या या भुकटीचे लेपन वज्रलेपासहित योग्य पृष्ठभागावर त्यानंतर विशिष्ट कुंचल्याच्या मदतीने केले जाई. सोन्याचा हा लेप सुकल्यावर त्याच्यावर जंगली रानडुकराच्या सुळ्याच्या चकतीने घर्षण करुन तो पक्का केला जाई. त्याची झळाळी या प्रक्रियेत जराही उणावत नाही असे लिहिले आहे. 

    शिल्परत्न ग्रंथामधे चित्रामधे सुवर्णाचा वापर भुकटी वज्रलेपात मिसळून किंवा वर्खरुपात केला जातो असा उल्लेख आहे. 

    कुशल चित्रकाराने रंग हळूवारपणे, डाग, ठिपका न पाडता रेखाकृतीमधे भरुन त्यात त्रिमिती परिणाम कसा साधला जाउ शकतो याचे वर्णनही शिल्परत्नामधे आहे. अजिंठ्याच्या चित्राकृतींमधे या तंत्राचा फ़ार सुरेख वापर झालेला पहायला मिळतो. गडद आणि उजळ रंगांचा, कठीण आणि मऊ पोताचा त्याकरता योग्य वापर करणे गरजेचे आहे. चित्राकृतीची बाह्यरेषा काजळीच्या कृष्ण रंगात बारीक कुंचल्याने रेखाटली जाते.  वर्तन क्रमाच्या म्हणजेच चित्राला सघनता आणण्याच्या तीन तंत्राचा उल्लेख त्यात आहे- पत्रज, बिंदुज आणि रेखिका. 

    चार प्रमुख रंगांचे प्रकार

    खनिज रंग- दगडांपासून बनलेले. काळा रंग बनवताना मातीच्या भांड्याचा पृष्ठभाग मोहरीच्या तेलाच्या दिव्याच्या ज्योतीवर धरुन काजळी जमवली जाई. बाभुळ गोंद आणि पाण्याच्या मिश्रणात ही काजळी बोटाने खलून मऊ काजळ काळा रंग बनवला जाई. जयपूरच्या लघुचित्रकारांची अजूनही हीच पद्धत आहे. लिहिण्याच्या शाईकरता जास्त गोंद मिसळला जाई. याचे वैशिष्ट्य म्हणजे हा रंग जरी पाण्यात मिसळून बनवलेला असे, तरी कागदावर लावला गेला आणि सुकला की त्यावर पाण्याचा परिणाम होत नसे. 

    वनस्पतीजन्य रंग- वनस्पती अथवा वृक्षाच्या वेगवेगळ्या भागांपासून बनवलेले रंग. उदा. लाल रंगाकरता पिंपळाच्या झाडाची साल, ती पाण्यात भिजवून स्वच्छ करतात. त्यात बोरॅक्स- सुहागा मिसळून कुटतात आणि लोहपात्रामधे तापवतात. त्यामुळे लाल रंग बाहेर येतो. हा रंग कापसाच्या वस्त्रामधे रंगाच्या वड्या करुन त्या ठेवतात.

    ऑक्साईड किंवा रसायनप्रक्रियेतून मिळालेले रंग- विविध रासायनिक प्रक्रियेतून ज्यात जाळणे, कुटणे किंवा वेगवेगळे पदार्थ मिसळणे अंतर्भुत असते. यामधे पदार्थांचे प्रमाण मोजूनमापून घेतले जाते. हिरव्या रंगाकरता एक शेर तांब्याची भुकटी आणि नवसादर (साल-अमोनिए) दोन शेर एकत्र करुन तांब्याच्या भांड्यात सठवले जाते. त्यात मिश्रणाच्या दोन बोटे वर येईल इतका लिंबाचा रस मिसळला जातो. भांड्याचे तोंड कापडाने बांधून ठेवले जाते, चाळीस दिवस. त्यानंतर आतले मिश्रण अंगच्या रसामधे कुटले जाते, सावलीमधे सुकवले जाते. त्यानंतर उत्तम प्रतीचा जंगल, म्हणजे हिरवा रंग मिळतो. गरज असेल त्यानुसार खळीमधे मिसळून हा रंग उपयोगात आणला जातो. गोंदाचा वापर त्याकरता करत नाहीत. 

    धातू रंग- सुवर्ण, रजत, शिसे यांची वस्त्रगाळ पूड तसेच अभ्रकाचे चूर्ण चित्रांमधे रंगवण्याकरता वापरली जाते. या धातूंची भुकटी इतकी बारीक, मऊ असते की त्यांचे लेपन रंगाइतकेच सहजतेनं होते. सोन्याचा वर्खही वापरला जातो. हा वर्ख चित्रामधे जिथे लावायचा असतो तिथे गोंद आणि साखर यांचे मिश्रण लावून त्यावर वर्खाचे पान चिकटवले जाते. त्यानंतर त्यावर तोंडाची वाफ़ सोडून वर्ख पक्का केला जातो. अतिशय सूक्ष्म आणि लहान पृष्ठभागाकरता सोन्या-चांदीची पेस्टही वापरली जाते, या पद्धतीला हिलकारी म्हणतात, त्याकरता गोंद अथवा खळीचे जाड मिश्रण किंवा मध धातूच्या पट्टीवर लावला जातो. त्यावर सोन्याचा वर्ख चिकटवून चार बोटांनी भराभर चोळला जातो आणि मग मळण्याच्या प्रक्रियेतून त्याची पेस्ट बनवली जाते. सोन्याच्या वर्खाच्या गोळ्या होऊ न देणे महत्वाचे असते. ही पेस्ट नंतर पाण्यात मिसळून जोरात मिश्रण हलवले जाते. त्यानंतर 24 तास ठेवून त्यातले पाणी वेगळे केले जाते. तळाशी जमलेली सोन्याची अथवा चांदीची अतिशय सूक्ष्म जराशा गोंदात मिसळून चित्रावर लावली जाते. त्यावर अगेट हा मौल्यवान दगड चोळला जातो, त्यामुळे रंग झळाळून येतो आणि कायमस्वरुपी टिकतो. 

    संदर्भाकरता आभार

    • द आर्ट ऑफ़ पेंटींग इन एनशियन्ट इण्डिया- श्रीनी वसावराव मार्ग इंडिया
    • चित्रसूत्र ऑफ़ द विष्णूधर्मोत्तरपुराण- पारुल दवे
    • भारतीय कला पर निबंध- क्षेमराज गुप्ता
    • सिम्बॉलिक कलर्स ऑफ़ इंडिया- सिम्थ केन्ट
    • चित्रकला- मराठी विश्वकोश- प्रथमावृत्ती
    • वर्तमान चित्रसूत्र- सडवेलकर, बाबुराव

    टीप – सदर लेखातील मते, विचार आणि लेखाची मांडणी ही संबंधित लेखकाची आहे.

  • भारतीय हस्तचित्रित नकाशांमध्ये शिवाचे चित्रण

    भारतीय हस्तचित्रित नकाशांमध्ये शिवाचे चित्रण

    जोधपूर शिवरहस्याचे सखोल संशोधन आणि विकास :

    इ.स. 1827 च्या आसपास जोधपूरच्या दरबारी कलाकारांनी शिव रहस्य नामक एक भव्य सचित्र हस्तलिखित ग्रंथ तयार केले, जे कदाचित भारतीय दरबारी चित्रकलेच्या इतिहासामध्ये या पूर्वी कधीच चित्रित केले गेले नव्हते. जोधपूरच्या महाराजा मानसिंग (इ.स. 1803-43) यांनी स्वतः चित्रकारांना या भव्य कामासाठी नियुक्त केले. हे चित्रे त्याच नावाच्या मजकूरावर आधारित आहेत, जी भगवान शिव यांच्या नित्य कर्माशी व त्याचे गौरव पाठ करण्या संबंधित आहेत, ज्याला tour de force असे देखील म्हणतात. मानसिंह हे नाथ संप्रदायाचे उपासक होते व त्याचे कठोर पालन करत. यासाठी त्यांनी दरबारातील चित्रकारांना शिव रहस्य चित्रित करण्यास प्रोत्साहन दिले. तेजस्वी रंग, चमकणारे सोने, दाट पर्णसंभार आणि भगवान शिव यांच्या विश्वाच्या दृश्यमय शब्दावलीमध्ये विणलेल्या चित्रित नकाशासारखी दृश्ये असे या चित्रांचे वैशिष्ट्य म्हणता येईल.

    एकूण 101 पुस्तकांपैकी (फोलिओ) आपण विशेषत: प्रथम-अंश म्हणजेच पहिले पुस्तक या संदर्भात माहिती बघणार आहोत. यात पहिल्या चाळीस चित्रांमध्ये शंकराच्या विश्वाचे मॅपिंग करणारे जटिल परंतु परखत संभाव्य कार्टोग्राफिक देखावे दर्शवितात. हे कार्टोग्राफिक देखावे म्हणजे शिवाच्या जटील विश्वाचे चित्रण असते, जे संभाव्य परमानंद प्राप्तीस सहाय्यीभूत होते. राजस्थानच्या कार्टोग्राफिक परंपरेबद्दल फारसे माहिती नाही किंबहुना त्यावर काम झाले नाही. या लेखाद्वारे मजकूर आणि चित्रांमधील तीर्थक्षेत्रांच्या प्रतिमा यांमधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न या लेखाद्वारा करणार आहे. या जटिल कार्टोग्राफिक दृश्यांचे निरीक्षण आणि विश्लेषण करून कलाकारांनी भारतीय अर्कचित्रविषयक परंपरेतून प्रेरणा कशी घेतली, याची विशिष्ट उदाहरणे या लेखातून देण्याचा प्रयत्न केला आहे. या लेखामध्ये दरबारातील काही चित्रांवर चर्चा आणि विशेषत: या पहिल्या भागातील सहा-सात चित्रांवर मर्यादित करीत आहे, जे शिवाच्या विश्वमंडळ आणि तीर्थक्षेत्रांच्या चित्रणात पेंटिंगमध्ये हे विषय कसे प्रतिबिंबित केले गेले ते दर्शवितात.

    कार्टोग्राफी  म्हणजे काय ?

    कार्टोग्राफी म्हणजे नकाशा तयार करण्याचे शास्त्र. इंटरनॅशनल कार्टोग्राफिक असोसिएशन यांनी नकाशा-शास्त्राची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे –

    Cartography is as the discipline dealing with the conception, production, dissemination and study of maps.

    म्हणजेच, नकाशाशास्त्र अभ्यास शाखेत संकल्पना, त्यानुसार नकाशे तयार करणे, या संकल्पनांचा प्रसार आणि या नकाश्यांचा संशोधानात्मक अभ्यास यांचा अंतर्भाव होतो. तसेच कार्टोग्राफी म्हणजे नकाशाचे प्रस्तुतीकरण करणे. याचाच अर्थ असा की, कार्टोग्राफी किंवा नकाशाशास्त्र ही मॅपिंगची संपूर्ण प्रक्रिया आहे.

    परंतु पुढे जाण्यापूर्वी आपण भारतीय नकाशा निर्मितीच्या संदर्भात कार्टोग्राफी म्हणजे काय ते समजून घेतले पाहिजे. भारतीय लिखाणामध्ये नकाशा या शब्दाचा अद्यापपर्यंत असा ठोस काहीही उल्लेख झाला नाही असे आपल्याला जाणवते, परंतु  आधुनिक काळात हा नकाशा उर्दू शब्द वापरला गेलेला आहे असे पुरावे सापडतात. भारतातील चित्रित कार्टोग्राफी इतिहास अस्पष्ट राहण्याची तीन कारणे सांगता येतील. ती कारणे म्हणजे या विषयातील शिष्यवृत्तीची कमतरता, उपलब्ध साहित्यचा अभाव आणि युरोपियन लोकांच्या आगमनापूर्वी कोणताही सातत्यपूर्ण आणि मजबूत संशोधक यांचा विकास न झाल्यामुळे हा विषय अस्पष्ट राहिला. पाश्चात्य कार्टोग्राफी आणि भारतीय नकाशा शास्त्राची संकल्पना या दोनही भिन्न पद्धतीच्या आहेत. पाश्चात्य कार्टोग्राफीत मापन पद्धतीत अंतराचा विचार केला जातो, तेच भारतीय पद्धतीमध्ये एका विशिष्ट जागेला महत्त्व दिले जाते. ही तत्त्वे कदाचित आपल्याला कार्टोग्राफीच्या श्रेणीतून पूर्णपणे वगळतील, परंतु जर आपल्याला भारतात अर्कचित्रलेखनाची परंपरा समजून घ्यायची असेल तर, आपल्याला त्याच्या पाश्चात्य आणि पारंपारिक अश्या दुहेरी पारिभाषिक सीमारेषा खंडित करण्याची आवश्यकता आहे.

    सुसान गोल लिहितात “सुरुवातीच्या चित्रकाराने एक किंवा अनेक नकाशे तयार केले जे धार्मिक व आध्यत्मिक ठिकाणी भेट दिलेल्या ठिकाणाची नोंद करण्यासाठी किंवा त्या ठिकाणी पुन्हा पोहोचण्याकरिता मार्गदर्शक म्हणून हे चित्रित केले असावे. सामान्यत: धार्मिक स्वरूपाचे काल्पनिक स्थाने स्पष्ट करण्यासाठी हे नकाशे वापरले जात.” या विधानावरून आपल्याला नकाशा तयार करण्याचे कार्य कसे होते ते समजते, आणि हे भारतीय अर्कचित्रांवर देखील कसे लागू केले जाऊ शकते ते सांगते.

    जयपूरमध्ये सापडलेल्या जाओरा लेणीच्या पेंटिंगपासून ते 19 व्या शतकाच्या नकाशांपर्यंतच्या कार्टोग्राफिक परंपरेचा गोल यांनी सर्वोत्तम पुरावा दिला आहे. माझे भरीव संशोधन तिच्या अभ्यासावर आधारित आहे. काही विशिष्ट उदाहरणांद्वारे आपण पुढील गोष्टी पाहूया, जसे कि जयपूर दरबारात कलाकारांद्वारे वापरल्या जाणाऱ्या कार्टोग्राफिक तंत्राचा विकास शोधण्याचा आणि जैन परंपरेतील पुष्टीमार्ग पंथ, पुष्टीमार्ग संप्रदाय आणि तिथे निर्मित तीर्थ-पट परंपरेविषयी चर्चा करीत त्यातील संदर्भ प्रस्थापित करण्याचा मी प्रयत्न केला आहे.

    जैन चित्रकला परंपरेतील सर्वात मनोरंजक विषय म्हणजे तीर्थ-पट. सामान्यत: कपड्यावर रंगविलेल्या, या दृश्यास्पद नमुनांनी गिरनार व शत्रुंजय या पवित्र स्थळांचे वर्णन करणारे नकाशे आहे जे जैन लोकांसाठी तीर्थस्थान चित्रण किती महत्त्वाचे होते यावर प्रकाश टाकतात.

    Jain Pilgrimage Pata, Rajasthan, circa 1750 CE, Brooklyn Museum.

    सर्वांत प्राचीन पटांपैकी एक म्हणजे, शत्रुंजयातील पवित्र स्थळ दर्शवणारा पट. हे पट बनवले गेले किंबहुना चित्रित केले गेले, विशेषत: त्या लोकांसाठी जे शारीरिकरित्या या तीर्थस्थानासाठी जाऊ शकत नव्हते. सामान्यत: जैन भक्त आंघोळ करुन या पटाच्या समोर बसून ध्यानमार्गाने तीर्थयात्रेला जात. याला भाव-यात्रा असे देखील म्हणतात. या पटामध्ये डाव्या बाजूला शत्रुंजयाचे पवित्र स्थळ दर्शविले गेले आहे – गुलाबी पर्वतावर विविध मंदिरे आहेत, तर एक नदी डावीकडे खाली वाहते. परंतु पांढर्‍या रंगातील पहिले जैन तीर्थंकर आदिनाथांची तुलनात्मकदृष्ट्या मोठी प्रतिमा वरच्या बाजूला पद्मासनात बसलेला चितारलेली आहे, जी आपले लक्ष वेधून घेते. तळाशी उजवीकडे असलेले मंडळ पालिताना गावचे प्रतिनिधित्व म्हणून चित्रित केले गेले असावे. जरी राजस्थानच्या कार्टोग्राफिक परंपरेबद्दल फारसे माहिती नसले तरी जयपूरच्या दरबारात हे अस्तित्वात होते हे मात्र निःसंशय आहे.

    इ.स. 1702 च्या सुमारास सुरतखाना येथे नोंदवलेल्या बारा नकाशांचा उल्लेख आपल्याला दस्तावेजांमध्ये आढळतो. खगोलशास्त्राच्या क्षेत्रातील आपल्या आवडी आणि संशोधनासाठी प्रसिध्द असलेले महाराज सवाई जयसिंग (इ.स. 1727 – 43) यांना देखील त्यांच्या कारकिर्दीत अर्कचित्रलेखनाची आवड होती, कारण आपल्याला त्याचे विस्तृत लेख, तसेच नकाश्यांचे उत्पादन त्यांचा साम्राज्यात झाले असे पुरावे सापडले आहेत. याच काळातील जलमहालच्या मूळ रेखांकनापासून ते दख्खन, हैदराबाद मधील किल्ल्यांचे नकाशे सापडले आहेत. शक्यतो अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात जोधपूरचा सर्वांत प्राचीन नकाशा वरीलपैकी एक आहे. भिंतींनी वेढलेला किल्ला मध्यभागी ठेवण्याचा कलाकाराचे चित्र आहे आणि बाह्यभाग कसे चित्रित करावे यापैकी काही नोंद नोंदविल्या गेल्या असल्यानेच याचे महत्त्व समजून घेण्यास मदत होते. गडाचा डोंगरावर चढत जाणाऱ्या पायऱ्या, पांढऱ्या संगमरवरी दर्शवल्याने कलाकारांची जैन तीर्थस्नान प्रति असणारी  जाणीव प्रकट होते. या पेंटिंगचे सर्वांत मनोरंजक वैशिष्ट्य हे असे कि याचे चित्रण अश्या पद्धतीने केले आहे कि चित्र कसेही वळविले गेले तरी साइड व्ह्यू मध्ये बघता येईल व हे सर्व चित्र त्रिमितीय भासतील.

    Map of Jodhpur, Early part of 18th century, Jaipur or Jodhpur.
    Collection: Maharaja Sawai Man Singh II Museum.

    महाराजा विजयसिंहांच्या (इ.स. 1752 – 93) कारकिर्दीत चित्रकलेच्या आकारात बदल होत गेले. छोट्या प्रमाणापासून ते मोठ्या स्मारक चित्रण स्वरूपापर्यंत निर्मिती झाली. जैन पटामध्ये जसे आपण पाहिले, तसेच कलावंत दर्शकांसमोर असलेल्या देवतांना हवाई (वरच्या बाजूने) दृष्टिकोनातून दर्शविण्याच्या वेगवेगळ्या कल्पना वापरतात. आणखी एक शक्यता म्हणजे कलाकार नाथद्वाराच्या पिच्छाई परंपरेपासून प्रेरित झाली असावे, कारण महाराजा विजय सिंह हे पुष्टीमार्ग परंपरेचे पालन करणारे वैष्णव भक्त होते.

    इ.स. 1804 च्या सुमारास जोधपूरमध्ये महाराज मानसिंगांची नाथ संप्रदाय बद्दलची भक्ती वाढली, तेव्हा त्यांचे आध्यात्मिक धर्मगुरू देवनाथ यांनी औपचारिकपणे भक्त म्हणून त्यांना दीक्षा दिली. इथे आपल्याला समजते की यामुळे दरबारामधील नकाशा सारख्या चित्रांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत नसेलही, परंतु सुरु झाली हे म्हणता येईल. मानसिंह यांना स्वतःच अर्कचित्रलेखनात रस होता की नाही ते माहित नाही, कारण दरबारी नोंदी याबद्दल मौन बाळगतात, परंतु हे निश्चित आहे की त्यांचे नाथ संप्रदायाचे पालन आणि मंदिराच्या बांधकामाबद्दल विशेषतः महामंदिर- हल्ली असलेले विशाल हवेली, त्याच्या बांधकामाच्या योजनांचा चित्रांचे समावेश असू शकतील, परंतु हे निश्चित आहे की कोणतीही अशी संग्रह सामग्री समोर आली नाही.

    Maharaja Man Singh and Dev Nath at Mahamandir Haveli, circa 1810 CE, Jodhpur.
    Collection: Mehrangarh Museum Trust.

    या चित्रामध्ये महाराज मानसिंह हे देवनाथ यांच्याबरोबर बसलेले चित्रित आहेत. या चित्राचा काळ आपल्याला सांगता येतो. या कार्टोग्राफीमध्ये चित्रकाराचे कौशल्य दर्शविणारी सर्वांत जुनी तारीख असलेले चित्र आहे. डॉ. डेब्रा डायमंड सांगतात “या पेंटिंगच्या कलाकारांनी अचूकपणे पुढच्या आणि पक्ष्याच्या डोळ्यांच्या दृष्टीकोनातून (प्लॅनिमेट्रिक दृश्यांसह) सामील होणारे चित्रांद्वारे वर्णन केले. इमारतींचे रस्ता, चाके, विहिरी आणि भूपूष्ठ योजना वरून पाहिल्याप्रमाणे रेखाटल्या गेल्या आहेत, तर लक्षणीय इमारती (तसेच झाडे आणि मानवी आकृती) सरळ पुढे पाहून चित्रित गेल्या आहेत असे दिसते.”

    Unidentified Haveli of Naths, near Jalore, circa 1820 CE, Jodhpur. Collection: Mehrangarh Museum Trust.

    जोधपूर दरबारात नाथ संप्रदाय प्रवेश करताच, ते साम्राज्यरीत्या शक्तिशाली झाले आणि त्यांनी नाथांच्या शक्तिशाली जागांची (शक्ती-पिठाचे) चित्रे काढायला सुरुवात केली. महाराजा मानसिंग यांनी वेगवेगळ्या भागात, विशेषत: जलोरमध्ये मंदिरे बांधण्यास सुरुवात केली. डावीकडून एक चमकणारी नदी वाहते तर पिवळ्या-गुलाबी रंगाच्या खडकाळ पर्वतांमध्ये, हवेलीसारखी रचना दिसते जिथे एक सिद्ध नाथ दुसऱ्या सिद्धबरोबर संभाषण करीत आहे. दुसरीकडे हवेलीच्या परिघामध्ये मांजरींबरोबर नाथ दिसतात, कदाचित ध्यानात बसलेले असावेत.

    अर्थातच प्रत्यक्ष नाही, परंतु नाथांचे वैश्विक जगाचे वर्णन करताना वेगवेगळ्या ग्रंथांचे वर्णन करताना जयपूरमधील जैन पट आणि नकाशा बनवण्याच्या परंपरेतून कलाकारांना प्रेरणा मिळाली असे दिसते. या भव्य चित्रांपैकी रामचरितमानस, नाथचरित, नाथपुराण, शिवपुराण, दुर्गाचरित, मेघमाला पेक्षा कलाकारांनी वैश्विक कॉर्टोग्राफीचे वर्णन करतांना जटिल दृश्य शब्दसंग्रह वापरले असे दिसते. आत्तापर्यंत, ऐतिहासिकदृष्ट्या माझा मुख्य लेखाचा विषय हा कलाविस्ताराला ग्रंथांपेक्षा इतके अधिक कसे चित्र चित्रित केले गेले ह्यांवर भर देण्याला आहे. काही विशिष्ट उदाहरणे जैन पट आणि जयपूर दरबारच्या नकाशांतून कलाकारांनी कशी प्रेरणा घेतली हे ज्ञान देण्यास आपल्याला मदत करू शकतात. गिरनारच्या आसपास राहणारे नाथ आधीच जैन तीर्थक्षेत्र असावे ही शक्यता नाकारणे कठीण आहे. तसेच, जयपूर आणि जोधपूरचे राजकीय आणि सांस्कृतिक संबंध होते जे पुढे जोधपूरच्या कार्टोग्राफीमध्ये चित्रित केले गेले होते या पुराव्यास समर्थन मिळते.

    The Mandala of Shiva, folio 8 from Shiva Rahasya, 1827 CE, Jodhpur. 
    Size: 46 x 121 cm. Collection: Mehrangarh Museum Trust.

    या मंडळामध्ये, कलावंतांच्या वैश्विक चित्रामध्ये एक नवीन दृश्यमय भाषा गुंफण्यासाठी कार्टोग्राफीचा वापर करून कलावंतांनी त्याचे ज्ञानचित्र तयार केले. ते दृश्य कैलास पर्वताचे आहे, जिथे भगवान शिव तीन भागांमध्ये आपल्या गणांसोबत नाचताना, मंडपात प्रवेश करताना आणि मध्यभागी स्वत:च्या लिंगाची उपासना करतांना दिसतात. इथे त्यांचे पुत्र कार्तिकेय आणि गणेश उपस्थित आहेत तर इतर देव सुवर्ण भिंतींच्या वाड्यात प्रवेश करणार आहेत. सुरुवातीच्या कार्टोग्राफर प्रमाणेच, कलाकारांनी भिंती चित्रित करणार्‍या मध्यवर्ती प्रसंगाला महत्त्व दिले आहे, जणू काही हवाई आणि सहा महाद्वीप आणि सात महासागर हिरव्या आणि चांदीच्या नागमोडी रेषेद्वारा दर्शविले गेले आहेत. 

    Shiva- Parvati giving Darshan  to the gods,  folio 12 from Shiva Rahasya, 1827 CE, Jodhpur. 
    Collection: Mehrangarh Museum Trust.

    वरील चित्र शिवाचे निवासस्थान दर्शविते. डावीकडील शिव-पार्वती या दैवी जोडप्याचे दैनंदिन क्रिया चित्रित आहेत – ते संभाषण करतांना, मिठी मारतांना आणि अगदी चौपट खेळताना दशविले आहेत. उजवीकडे कृष्ण / विष्णू, ब्रह्मा आणि इतर गौण देवता आहेत, ज्यांना देवतांचे चमत्कारिक पवित्र दर्शन झाले आहे. मध्यवर्ती भाग जो तटबंदीच्या भिंतींच्या आत स्थित त्यांचे निवासस्थान दर्शवितो. ते सुवर्ण मंडपात बसलेले आहेत जे मंदिर देखील दर्शवते. येथे, कलाकाराने आपल्या चित्रांमधील निवासस्थानाची कल्पना करण्यासाठी नकाशा तयार करण्याच्या तंत्रज्ञानाचा उपयोग केला आहे. या चित्रकलेच्या मध्यवर्ती भागाशी तुलना केल्यास जयपूर कार्टोग्राफिक परंपरेत जोधपूर दरबारात कशी दाखल झाली याची झलक आपल्याला दिसून येते.

    Shiva reveals the geography of the three worlds to Parvati, folio 13 from Shiva Rahasya, 1827 CE, Jodhpur.  Attributed to Vana Akhavat. Size: 40.4 x 115.6 cm. Collection: Mehrangarh Museum Trust.

    संदर्भ सूची :

    • गोल, सुसान. १९८९. भारतीय नकाशे आणि योजना.
    • श्वार्ट्जबर्ग, जोसेफ. दक्षिण आशियाई कार्टोग्राफीचा परिचय.
    • गोल, सुसान. १९९०.भारतीय कार्टोग्राफीमध्ये आकाराचे महत्त्व. चित्र मुंडी.
    • मिश्रा, शैलका. २०१४ -१५. १८ व्या शतकात अंबर-जयपूर सुरतखाना येथे नकाशे आणि नकाशा बनविणे. ज्ञानप्रवाह संशोधन जर्नल.
    • क्रिल, रोझमेरी. २०००. मारवाड चित्रकला: जोधपूर शैलीचा इतिहास. मेहरानगड पब्लिशर्स यांच्या संयुक्त विद्यमाने इंडिया बुक हाऊस.
    • भाटी, नारायण सिंह. १९७९. महाराजा मानसिंह री ख्याट. राजस्थान ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट, जोधपूर.
    • शर्मा, अंशिका. २०१६. पाली रागमाला. अप्रकाशित एम.व्ही.ए प्रबंध.
    • अग्रवाल, राम अवतार १९७७. मारवाड़ म्युरल्स.अगम कला प्रकाशन.
    • टॉप्सफिल्ड, अँड्र्यू. २०००. राजस्थानमधील कोर्टी पेंटिंग. मार्ग प्रकाशक.
    • सिंग, चंद्रमणी. १९८६. अठराव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात कपड्यावर शहरातील    नकाशे (अंतर्गत) भारतीय कला स्वरूप. व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम,लंडन.

    टीप – सदर लेखातील मते, विचार आणि लेखाची मांडणी ही संबंधित लेखकाची आहे.

  • श्रीशिवराजाभिषेकप्रयोगः आणि सिंहासन

    श्रीशिवराजाभिषेकप्रयोगः आणि सिंहासन

    राजा कालस्य कारणम्, राजा राष्ट्रकृतं पापं राज्ञः पापं पुरोहितः, ना विष्णुः पृथिवीपतिः या आणि अनेक अशा संकल्पनांद्वारे आपणास राजाचे महत्त्व भारतीय इतिहास आणि संस्कृतीमध्ये दिसून येते. भारतीय इतिहास, संस्कृती, राजकारण, लोकाचरण यावर धर्माचा पगडा दिसून येतो. आपल्याकडील साहित्य आणि तत्त्वज्ञानावर सुध्दा धर्माचा पगडा असल्याने धर्मकेंद्री आणि नीतीतत्त्वे यांची परिभाषा स्पष्ट करणाऱ्या साहित्याची निर्मीती प्राचीन काळात झालेली आहे. प्राचीन भारतीय मान्यतेनुसार धर्म मागे पडून जेव्हा अधर्म समाजव्यवस्थेवर प्रभावी होवू लागला, तेव्हा धर्माचे रक्षण आणि पालन यासाठी राजा आणि राजसंस्था निर्मीती करण्यात आली. ऐतरेय ब्राह्मणात राजसंस्था उदयास येतात याबद्दल अनेक मनोरंजक उल्लेख आढळतात त्यापैकीच हा एक-

    देवासुरा एषु लोकेषु समयतन्त
    तांस्तातोऽसुरा अजयन् ।
    देवा अब्रुवन् राजतया वै नो जयन्ति राजानं करवामहा इति
    – (ऐतरेय ब्राह्मण)

    अर्थः- “देव आणि असूर यांचे या लोकी युध्द झाले; त्यांत असुरांनी देवांचा पराभव केला.  तेव्हा देवांनी विचार करुन ठरविले की राजाच्या (सिंहासनाच्या) बळावर असूर आमचा पराभव करितात यासाठी आपणही कोणाला तरी राजा (करुन त्याचे सिंहासनारोहण) करु या”

    उपरोक्त श्लोकात नमूद केलेनुसार देवांनाही असूरांकडून होणाऱ्या पराभवाची मिमांसा करताना असे जाणवले की, राजा आणि सिंहासन या दोन गोष्टींचा असूरांच्या विजयात महत्त्वाचा वाटा आहे. नंतरच्या काळात ना विष्णुः पृथिवीपतिः या संकल्पनेत राजा हा ईश्वराचा अंश असतो हे मान्य केले आहे. परंतू वरील श्लोकात तर देवांनाच आपल्याकडेही राजसंस्थेची आवश्यकता नमूद केले आहे. राजा या पदासाठी लोकोत्तर पुरुषाची निवड, राज घरण्यातील वंशज अथवा तत्कालीन समिती अथवा सभेद्वारा निवड यापध्दती उपलब्ध होत्याच. तरीही राजाच्या नियुक्तीची प्रक्रीया म्हणजेच राज्याभिषेकास अनन्यसाधारण महत्त्व वेदकाळात होते. वेदकाळात राज्याभिषेक आणि ज्या आसनावर राजाचा अभिषेक होत असे त्याबदल माहिती आपणास ऐतरेय ब्राह्मणां मध्ये मिळून जाते. ऐतरेय ब्राह्मणांत नमूद केलेल्या विहित पध्दतीशिवाय राजाच्या राज्याभिषेकास सशास्त्र स्वरुप प्राप्त होत नाही. शिवाजी महाराजांनी जेव्हा आपला राज्याभिषेक करण्याचा मानस जेव्हा, आपल्या मंत्रिमंडळ आणि सभासदांपुढे व्यक्त केला तेव्हा, सशास्त्र राज्याभिषेक असलेल्या अडचणीची चर्चा करण्यात आली. विजयनगर आणि देवगिरीच्या यादवांचे राज्य अस्तास गेल्यानंतर बराच शतकापर्यंत कोणत्याही राजाच्या राज्याभिषेकाचा योग आलेला नव्हता. दरम्यानच्या काळात मोघल आणि सुलतानांच्याकडून पदवी स्वरुपात मिळणाऱ्या राजे पदास प्राप्त करुनच धन्यता मानणाऱ्या नेतृत्त्वांचा उदय झालेला होता. महाराष्ट्रातील पंडीत, ब्राह्मण मंडळीं राज्याभिषेक विधी-पध्दतीबद्दल अनभिज्ञ असल्याने आणि इतरही कारणाने महाराजांनी काशीतील गागाभट्टांकडून राज्याभिषेक करुन घेतला. 

    गागाभट्टांनी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी काय विशेष प्रयत्न केले आणि महाराजांचा राज्याभिषेक महाराष्ट्रातील पंडीतांकडून न होता ते गागाभट्टांनीच का केले याबद्दल आपण पुढे पाहणारच आहोत. तत्पुर्वी ज्या विधीमुळे राज्याभिषेकास सशास्त्र विधीचे स्वरुप प्राप्त होते अशा ऐतरेय ब्राह्मणां तील अभिषेकाचा विधी कसा असतो ते पाहू या. ऐतरेय ब्राह्मण हा ब्राह्मण ग्रंथांच्या समुहाचा एक भाग आहे जसे शतपथ, गोपथ, कठ, कपिष्ठल, तैत्तिरीय इ. ब्राह्मणे होय.  मुळातच ब्राह्मण ग्रंथांचा मुख्य विषय म्हणजे यज्ञ होय. त्यानुषंगानेच सोमयाग, राजसूय, अश्वमेध यासारखे यज्ञ ही ब्राह्मण ग्रंथात सांगितले आहेत. अश्वमेध सारखा यज्ञ करणे म्हणजे राजाने आपल्या सार्वभौमत्वाची परिक्षाच देणे होय. राजा आणि प्रजा या दोघांमधील संबंध अधिक बळकट करण्यासाठी राजसूय व अश्वमेध यासारख्या यज्ञाचा उपयोग होत असे. प्रजेच्या बरोबरीने असे अनुष्ठान केले की राष्ट्र समृध्द बनते अशी त्या काळाची धारणा होती. ऐतरेय ब्राह्मणांत अभिषेक विधीबद्दल माहिती देण्यात आली असून राजा हा सम्राट, स्वराट, विराट इ. पदवीने युक्त होण्यासाठी राजाला अभिषेक करावा असे नमूद आहे.अथर्ववेदात अभिषेक हा शब्द बऱ्याच ठिकाणी आढळून येतो आणि याच्या संस्काराचे विवरणे सुध्दा आढळतात. जिथे कृष्ण यजुर्वेदात अभिषेकास राजसूय यंज्ञाचा एक भाग म्हणून पार पाडले जाते तिथेच ऐतरेय ब्राह्मणांत अभिषेक हा मुख्य विधी समजला गेला आहे. ऐतरेय ब्राह्मणांत अभिषेकाचे पुनराभिषेक (अष्टम ५-११) आणि ऐंद्र महाभिषेक (अष्टम १२-२०) असे दोन प्रकार सांगितले आहेत. ऐंद्र महाभिषेक इंद्राच्या राज्याभिषेक विधीशी संबंधित असून पुनराभिषेकात राजाचा राज्याभिषेक आणि आसंदी (सिंहासन) आरोहण विधी सांगितला आहे.  

    ऐतरेय ब्राह्मणांत आठव्या खंडात पुनराभिषेक विधीच्या अनुषंगाने सांगितले आहे की, “पुनराभिषेक विधी हा राजासाठी क्षत्रिय म्हणून पुर्नजन्मच (Rebirth) आहे. विधीपूर्वक केलेला अभिषेक आणि पशूबळीनंतर हा यज्ञ पुर्ण (इष्टी) झाला समजण्यात येतो.”

    ऐतरेय ब्राह्मणांत अभिषेकाबद्दल नमूद केलेली ऋचा खालील प्रमाणे आहे-

    तस्यैते पुरस्तादेव संभारा उपक्लृप्ता भवन्त्यौदुम्बर्यासन्दी
    तस्यै प्रादेशमात्राः पादाः स्युररत्निमात्राणि शीर्षण्यानूच्यानि
    मौञ्जं  विवयनं व्याघ्रचर्माऽऽस्तरणमौदुम्बरश्वमस उदम्बरशाखा
    तस्मिन्नेतस्मिंश्चमसेऽष्टातयानि निषुतानि भवन्ति दधि मधु
    सर्पिरातपवर्ष्या आपः शष्याणिच तोक्मानिच सुरा दूर्वा, इति।
    – (ऐतरेय ब्राह्मण)

    अर्थः- “अभिषेकास आरंभ करण्यापूर्वी आवश्यक ती सर्व तयारी करणे आवश्यक आहे. (उदाहरणात) औदुंबराच्या लाकडाच्या सहाय्याने आसन (सिंहासन) तयार करणे; हे आसन  साधारणतः आगंठा आणि तर्जनी यांच्या मधील वीतभर अंतर एवढे उंच असावे, अर्ध्या बाहू ऐवढे परंपरागत शिरस्त्राण, (तसेच याही वस्तू पुरविल्या पाहिजेत) गवताच्या बांधणीने बनवलेली दोर, आसनावर पसरविण्यासाठी वाघाचे चामडे, औदुंबराच्या लाकडाची पळी (यज्ञासाठी) आणि औदुंबर वृक्षाची (छोटी) फांदी.  अभिषेकामध्ये दही, मध, शुध्द तुप, निर्मल पावसाचे पाणी,  अंकुरीत गवत आणि हिरवे जव, सुरा (एक पेय) आणि दुर्वा.”

    तद्यैषा दक्षिणा स्फ्यवर्तनिर्वेदेर्भवति तत्रैतां प्राचीमासन्दीं
    प्रतिष्ठापयति तस्या अन्तर्वेदि द्वौ पादौ भवतो बहिर्वेदि द्वावियं
    वै श्रीस्तस्या एतत्परिमितं  रुपं यदन्तर्वेद्यष भूमाऽपरिमितो यो
    बहिर्वेदि तद्यदस्या  अन्तर्वेदि द्वौ पादौ भवतो बहिर्वेदि द्वा उभयोः
    कामयोरुपाप्त्यै यश्चान्तर्वेदि यश्च बहिर्वेदि ॥
    – (ऐतरेय ब्राह्मण)

    अर्थः- “आसनाची (सिंहासनाची) मांडणी वेदीच्या दक्षिण दिशेला करुन लाकडाच्या पट्टीने वेदीशी असे जोडावे की, आसनाचा पुढील भाग हा पुर्वेकडे असेल आणि आसनाचे दोन पाय वेदीत आणि दोन पाय बाहेर राहतील.  यादरम्यान यज्ञाची भूमी ही भविष्य (म्हणजेच भाग्याच्या देवतेचे प्रतिक) असेल; वेदीमधील काही जागा तिच्यासाठी असेल आणि त्याचबरोबर बाहेरील सर्व जगही (अनंत भूमी).  जर आसनाचे दोन पाय वेदीच्या आंत आणि दोन बाहेर असतील, तर वेदीच्या आतील इच्छित लाभांच्या (यज्ञांच्या उद्देशातून होणा-या) बरोबरच वेदी बाहेरील लाभांची (म्हणजे यज्ञाच्या उद्देशा व्यतिरिक्त इतरही लाभांची) प्राप्ती होईल.”

    या प्रमाणे राज्याभिषेकाचा व ऐंद्र महाभिषेकचा विधी नमूद करत असतांना आसंदी म्हणजेच सिंहासनाची स्थापना, अभिषेक, पुजन, आरोहण या संदर्भाने घडणाऱ्या विधींचे विस्तृत वर्णन ऐतरेय ब्राह्मणात करण्यात आलेले आहे. अभिषेक विधी आणि सिंहासनारोहण याचे सखोल विवेंचन मी माझ्या पुस्तकात विस्तृतपणे करणारच आहे. परंतू ऐतरेय ब्राह्मण ग्रंथातील राज्याभिषेक विधीचा उल्लेख येथे करण्याचे एक वेगळेच कारण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी गागाभट्टांनी “श्रीशिवराज्याभिषेकप्रयोगः” हि जी पोथी बनवली होती तेव्हा ऐतरेय ब्राह्मणाचा योग्य वापर संदर्भ ग्रंथ म्हणून केलेला दिसून येतो. ऐतरेय ब्राह्मणाबरोबर वशिष्ठ संहितेचा ही उपयोग ही पोथी बनविण्यासाठी केलेला आहे.

    महर्षि वशिष्ठ हे वैदिक काळातील विख्यात ऋषी आणि सनातन मान्यतेमधील सप्तर्षिंपैकी एक होत. योग-वशिष्ठ, रामायण, वशिष्ठ धर्मसूत्र, वशिष्ठ संहिता, वशिष्ठ पुराण, धनुर्वेद या ग्रंथांची निर्मीती करणाऱ्या वशिष्ठांना सृष्टी रचेत्या ब्रह्माचा मानस पुत्र म्हणुनही उल्लेख पुराणात आढळतो. निमि राजाच्या विवाहानंतर वशिष्ठांनी सुर्य वंशाच्या दुसऱ्या शाखांचे पुरोहित कर्म सोडून फक्त इक्ष्वाकु वंशाचे पुरोहित पद स्विकारले. राजा दशरथासाठी पुत्रेष्टि यज्ञ, राजसुय यज्ञ, गंगावतरण, रामाचा वनवासापूर्वीचा आणि नंतरचा राजाभिषेक अशा अनेक महत्त्वाच्या विधींच पौरोहित्य पद त्यांच्याकडेच होते. ऋग्वेदाच्या सातव्या मंडळाचे ते रचनाकार असुन वशिष्ठ धर्मसूत्रामध्ये वर्ण आश्रमाचे धर्म, संस्कार, राजधर्म, प्रायश्चित, दान, सदाचार या संबंधाने लिखाण त्यांनी केलेले आहे. सिंहासनाच्या अभ्यासाच्या अनुषंगाने वशिष्ठ संहिता हा ग्रंथ महत्वाचा आहे. वशिष्ठ संहिता हा एक शाक्त ग्रंथ असून ज्योतिष विद्येवर आधारीत ४६ आध्ययांमार्फत शांती, होम, बली, दान वगैरे या विषयांची मांडणी यामध्ये केली आहे.  संहितेमध्ये ३३ व्या अध्ययामध्ये राज्याभिषेक विधी बद्दल सांगून राज्याभिषेकाचा योग्य मुहुर्ताबद्दल भाष्य करतांना योग्य मुहुर्ताचे फायदे, उपयुक्तता सांगत अयोग्य मुहुर्ताचे अनिष्ठ परिणाम ही त्यांनी सांगीतले आहेत.  याविधी दरम्यान राजा पृथ्वीचा अधिपति होण्यासाठी हा विधी सांगतानाच सिंहासनाबद्दल खालील प्रमाणे उल्लेख येतो –

    प्राग्भागे मंदिरस्याथ गोमयेन तु कारयेत्।
    मंडलं चतुरस्त्रं तद्वर्णकैः समलंकृतम् ॥
    तत्र भद्रासनं सम्यग् अर्चयेत्सुमनोहरम् ।
    गंगातोयसुसंपूर्णस्वर्ण कुंभोदकैः सह ॥
    – (वशिष्ठ संहिता)

    अर्थः- “प्रारंभी (राज) मंदिराच्या पूर्वभागास द्रोणाचे चतुष्कोणी मंडल करवून, ते रांगोळी, हळादकुंकू इत्यादींनी सुशोभित करावे.  तेथे सुंदर व मंगल अशा भद्रासनाची (सिंहासनाची) गंगाजलाने परिपूर्ण असलेल्या सुवर्णकलशासह व कुभोदकासह पुजा करावी”

    या विधीसाठी सर्व दिशांना ठरवलेल्या प्रमाणे गंध, माळा, वस्त्र, सोने, रत्न, मृत्तिका, बैलाचे शिंग, हस्तिदंत इ. वस्तू घेवून ‘देवस्य त्वा’ या मंत्राने शुभ मुहुर्तावर पुढील विधी करावा –

    आब्लिंगैर्वेदमंत्रैश्र्च शुभलग्ने शुभान्विते ।
    भद्रासने स नृपतिरभिषेकं च  कारयेत् ॥
    नीराजनं च कर्तव्यं शंखवादित्रानिःस्वनै।
    आशिषो वाचनं कृत्वा पूजयेच्च सुरान्पितृन्॥
    आयुधानि पदंचैव विप्रान् गंध दिनार्चयेत्।
    शुक्लमाल्यांबरधृतः प्राड्श्रुखस्य महीपतेः॥
    पट्टं शिरसि बध्नीयात् सिहासनगतस्य च।
    विप्रेभ्यो दक्षिणां दद्यात मानयेन्मंत्रपूर्वकम्॥
    – (वशिष्ठ संहिता)

    अर्थः- “शुभ युक्त शुभ लग्नावर, “आपी हि ष्ठा” इत्यादि वेद मंत्रानी भद्रासनावर त्या नृपतीने अभिषेक करवून घ्यावा. शस्त्र व वाद्यें याच्या निनादात निराजन ओवळावे. आशिर्वादाचे मंत्र म्हणून देवाचे आणि पितरांचे पूजन करावे. “गन्ध द्वारा” इत्यादि मंत्र म्हणून आयुधे व ब्राह्मणाचे चरण यांचे अर्चन करावे.  शुभ माळा व वस्त्रे धारण करणा-या पुरोहिताने, पुर्वाभिमुख सिंहासनावर बसलेल्या राजाच्या मस्तकावर फेटा बांधावा व ब्राह्मणांना दक्षिणा देऊन मंत्रपूर्वक त्यांचा सन्मान करावा.”

    या प्रमाणे राज्याभिषेक विधी आणि अभिषेक प्रसंगी केल्या जाणा-या मंत्रोच्चाराचा जरी या अध्ययात समावेश केला असला, तरी गागाभट्टांनी ‘वशिष्ठ संहिते’चा उपयोग आपल्या ‘श्रीशिवराज्याभिषेकप्रयोगः’ मध्ये अभिषेकाची सुरुवात (प्रस्तावणा) म्हणूनच केलेला दिसून येतो.  

    शिवाजी महाराजांनी आपला सशास्त्र राज्याभिषेक करण्याचा निश्चिय केल्याने त्यास योग्य न्याय देईल असे एकमेव गागाभट होते. गागाभट्ट हे धर्मशास्त्राचे जानकार असे विद्वान मूळचे महाराष्ट्रातील पैठणचे मात्र त्यांचे पूर्वज काशी येथे गेले आणि स्थायिक झाले. त्यांच नांव विश्वेश्वर परंतू त्यांचे वडील त्यांस गागा या नावाने हाक मारीत म्हणून त्यांचे नांव गागाभट्ट असेच रुढ झाले. गागाभट्टांनी काशी येथे आपले शिक्षण पुर्ण करत न्याय, मीमांसा, वेदांत या मध्ये प्राविण्य मिळविले. त्यांनी अनेक ग्रंथांची रचना केलीली असून यामध्येही त्यांनी धर्मशास्त्रावरील ग्रथांनाच प्राधान्य दिलेले आहे. मीमांसाकुसुमांजलि, पिण्डपित्रयज्ञप्रयोग, सुज्ञानदुर्गोदय, राकागमसुधा, भाट्टचिन्तामणि, दिनकरोद्योत, तुलादानप्रयोग इ. ग्रंथ गागाभट्टांनी लिहलेले आहेत. गागाभट्टांचे पांडित्य आणि धर्मशास्त्रातील त्यांचे विद्यार्जन यामुळे त्यांना उत्तर भारतात न्याय आणि धर्मसभांमध्ये मानाचे स्थान होते. परंतु महाराजांनी त्यांना राज्याभिषेकासाठी निवडण्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे त्यांनी केलेले कृष्णस नरसिंह शेष यांच्या मताचे केलेले खंडन होय. सम्राट अकबराच्या काळात कृष्ण नरसिंह शेष नावाच्या एका विद्वानाने शुद्राचारशिरोमणि नावाचा ग्रंथ काशी तेथे रचला होता. ‘कलियुगात क्षत्रिय उरले नाहीत’ असा सिद्धांत त्याने या ग्रंथात मांडला. या सिद्धांताचा प्रभाव अन्य प्रांतांतील समाजाप्रमाणे महाराष्ट्रातील समाजावरही पडलेला होता. गागाभट्टांनी शुद्राचारशिरोमणि यातील कृष्णशेषाच्या मतांचे पूर्ण खंडण केले. त्यांनी व त्यांच्या सहकारी पंडीतांनी क्षत्रिय वर्णाच्या अस्तिवाचा सिध्दांत आपल्या तर्काने आणि विचाराने उत्तर भारतात मांडला. नीलकंठभट्टकृत व्यवहारमयूख, कमलाकरभट्टकृत निर्णयकमलाकर उर्फ निर्णयसिंधू, दिनकरभट्टकृत दिनकरोद्योत इत्यादी ग्रंथात कृष्णशेषाच्या मताचे मार्मिक खंडन करण्यात आलेले आहे.   

    कृष्णशेषाच्या मताचे खंडन झाल्यामुळे जयपूर, उदेपूर येथे राज्याभिषेक, सिंहासन, व्रतबंध होत होते. जयसिंग यांनी काशी क्षेत्री कलियुगात वर्ज असलेला अश्वमेध केला होता. गागाभट्टांनी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी आवश्यक त्यासर्व विधींचे संकलन करुन त्याची पोथी बनविण्यासाठी घेतली. शिवाजी महाराजांच्या आवश्यकतेनुसार राज्याभिषेकाचा प्रकार निवडणे हे आवश्यक होते. ज्येष्ठ इतिहास कर वा. सी. बेंद्रे यांनी राज्याभिषेकाचे खालील प्रमाणे तीन प्रकार सांगितले आहेत.- 

    (१) सांवत्सराभिषेक  किंवा मंचकारोहन – पहिल्यापासूनच अस्तित्वात असलेल्या सिंहासनावर आरोहण जे राजा आजारी अथवा मृत्यूनंतर संवत्सर पुरोहिताद्वारे केले जाते. 

    (२) संवत्सराभिषेक किंवा जन्मनक्षत्रे अभिषेकः – हा अभिषेक नियतकालिक म्हणजे वार्षिक किंवा मासिक समारंभ असतो. ज्या नक्षत्रावर राजाचा प्रथम अभिषेक केलेला असतो, त्याच नक्षत्रावर दरवर्षी आणि महिन्याला केला जातो. 

    (३) महाराजाभिषेक किंवा ऐन्द्र्याभिषेक सोहळा – राज्याभिषेकाचा हा प्रकार नवीन राज्य वा सिंहासनावर किंवा राजास सम्राटाचा दर्जा मिळतो तेव्हा केले जाते. 

    गागाभट्टांनी महाराजांचा राज्याभिषेक ‘महाराजाभिषेक किंवा ऐन्द्र्याभिषेक’ पध्दतीने करावयाचे निश्चित केले. कोण –कोणते विधी करावयाचे निश्चित केले. राज्याभिषेक विधि कसा करावयाचा, कोणकोणते धार्मिक विधि व समारंभ कोणत्या दिवशी व कोणत्या वेळी करावयाचे याचे तपशिलवार वर्णन ‘श्रीशिवराज्याभिषेकप्रयोगः’ या पोथीमध्ये करण्यात आले. या पोथीमध्ये खालील प्रमाणे विधींचे तिथीनुसार वर्गीकरण केलेले आहे.-

    श्रीशिवराज्याभिषेकप्रयोगामधील विधींच्या क्रमांनुसार आवश्यक ते साहित्य, फुले, सेवक, गायक, मंत्र-जप करणारे जापक, गवय्ये, वैदिक, ब्राह्मणवृंद यांची व्यवस्था करण्यात आली होती. राज्याभिषेकामध्ये राजाच्या आसनाला अनन्यसाधारण महत्व असल्याने विधीनुसार लागणा-या आसनांची व्यवस्था अधिच करुन ठेवलेली होती. या पोथीमधील राज्याभिषेक विधी (श्लोक ३ ते २९ ) मुळात वसिष्ठ संहितेतील ३३ व्या राज्याभिषेकाध्यायातील (श्लोक १ ते २७) आहेत. पुढील विधीचा भाग हा विष्णुधर्मोत्तर मध्ये सांगितलेला आहे. पोथीमध्ये मंचक, भद्रासन, पीठ, आसंदी, सिंहासन अशा विविध नावांनी राजाच्या आसनाबद्दल उल्लेख आलेला आहे. परंतू विष्णुधर्मोत्तर पुराणात खालील प्रमाणे आसनाचे प्रकार सांगितले आहेत – 

    प्रहारतः प्रयोक्तव्यमावेशे क्रन्दने तथा ।
    भद्रासनं तु देवानां राज्ञां सिंहासनं भवेत ।।
    रूप्यासनं तु दातव्यं सांवत्सरपुरोधसोः ।
    वेत्रासनममात्यानां मन्त्रिणां तु तथा भवेत ।।
    मन्दासनं तु दातव्यं सेनानीयुवराजयोः ।
    मुनीनां च द्विजानां च तथा सब्रह्मचारिणाम् ।।  (विष्णूधर्मोत्तरपुराणम्) 

    “विष्णूधर्मोत्तर पुराणात सिंहासन हे राजाचे आसन असून देवांसाठी भद्रासन वापरावे असे सांगीतले आहे.  तसेच रुप्यासन(चांदीचे आसन) हे राज ज्योतिषी(पुरोहीत) व प्रधानास आणि मंत्री व सचिवांना वेत्रासन (लाकडाचे) वापरावे हे नमूद करत सेनापती व युवराजास मंदासन (मंद वनस्पतीच्या पासून बनवलेल) वापरावे”

    श्रीशिवराज्याभिषेकप्रयोगामधील सिंहासनाचे उल्लेख 

    राज्याभिषेकाच्या पहिल्या दिवशी विनायक शांतीनंतर वेदीची स्थापना करुन भद्रासनावर महाराजांना आसनस्त करुन त्यांस मृत्तिकास्नान घालण्यात आले. पुढील दिवशी सुध्दा सप्तमृत्तिकाने अभिषेक करुन महाराजांना अभिषेक करण्यात आला. वेगवेगळ्या दिवशी कोणते कोणते विधी करण्यात आले हे उरोक्त परिच्छेदात नमूद केले आहे. परंतू सिंहासनारोहणाचा मुख्य विधी हा ६ जून १६७४ ला आठव्या दिवशी होणार होता. गागा भट्टांनी  “ज्येष्ठ शुध्द १२, शुक्रवार घटी २१, पळे ३४, विष्कंभ ३८, घटिका ४०,पळे सिं ४२ तीन घटिका रात्र उरली” असतानाचा मुहूर्त काढला होता. सुर्योदयापूर्वी तास-सव्वातास अधिचा हा मुहूर्त म्हणजेच नेहमी ज्या वेळेस गर्गाचार्याचा मुहूर्त म्हणतात तोच हा होय. या दिवशी महाराजांचे दोन महत्वाचे अभिषेक झाले एक अभिषेक शाळेत भद्रासनावर तर एक वेदी जवळ आसंदीवर. ऐन्द्र्याभिषेकाचा विधी पुर्ण झाल्यावर महाराज सदरेवर आले आणि सिंहासनारोहणाचा मुख्य विधी तेथे पार पडला. श्री शिवराज्याभिषेक प्रयोगः मध्ये सिंहासनारोहणाच्या विधीबद्दल खालील बाब नमूद आहे –

    ततः सभामंडपस्थापितसिंहासने वृषमार्जारद्विपिसिंहव्याघ्र-
    चर्मस्तुते मंगलघोषेण उपविश्य अस्य सिरसि स्वस्ति
    नो मिमीत्येति पट्टं बध्नीयात्। ततः तत्र प्रतिहारोऽमात्यान्
    पौरान् नैगमान् पंडितान् वाणिजोऽन्यांश्च लोकान् प्रदर्शयेत्।
    – (श्री शिवराज्याभिषेक प्रयोगः)

    अर्थः- “त्यानंतर सभामंडपात (सदरेवर) स्थापन केलेल्या सिंहासनावर, बैल, माजर, हत्ती, सिंह, वाघ याची कातडी आथरुन त्यावर मंगलघोषात (शिवाजी महाराजांना) बसवून त्या मस्तकावर “स्वस्ति नो मिमीत्य” इत्यादी मंत्र म्हणत पट्टबंधन करावे (जीरेटोप परिधान करण्यात यावा) त्यानंतर तेथल्या प्रतिहाराने अमात्य (अष्टप्रधान), नगरप्रमुख (प्रमुख सरदार व किल्लेदार), वेदज्ञ पंडित (गागाभट्ट, बाळंभट्ट, निश्चलपुरी व परंमानंद गोसावी), व्यापारी व इतर लोकांची ओळख करुन द्यावी.” 

    या प्रसंगास अनुसरुनच शिवाजी महाराजांनी इंग्रज अधिकारी हेन्री ऑक्झिडेन यास गडावर रोखून ठेवले होते. सिंहासनारोहण झालेनंतर छत्रपती म्हणून आपल्या अष्टप्रधान, सुभेदार, सरदार यांच्याबरोबरच व्यापारी व रयते सोबत भेटवस्तुंची देवान-घेवानीचा सोहळा प्रत्यक्षात पार पडला.  ऑक्झिडेन ह्या सोहळ्यास प्रत्यक्ष हजर होता आणि त्याने या सोहळ्याचे वर्णन आपल्या डायरीमध्येही नमूद करुन ठेवले आहे. ऑक्झिडेन लिहतो, “साधारण ७-८ वाजता आम्ही दरबारात गेलो. त्या वेळी (छत्रपति शिवाजी) राजा भव्य सिंहासनावर आरुढ झालेला व मूल्यवान पोशाखात असलेल्या (अष्ट) प्रधानांनी वेढलेला दिसला. त्याचा पुत्र संभाजी राजा, पेशवा मोरो पंत आणि एक श्रेष्ठ ब्राह्मण (बाळंभट्ट ?) हे सिंहासनाच्या खाली पायरीवर (अगर ओट्यावर) बसले होते. इतर बाकी अमंलदार, सेनापती सह (सिंहासनाच्या) बाजुला आदराने उभे होते. मी (काही अंतरावरुनच) मुजरा केला आणि नारायण शेणव्याने (सार्वभौम सिंहासनाधिश्वरास) नजर करावयाची हि-याची अंगठी (सिंहासनाच्या दिशेने) वर धरली. शिवाजीचे आमच्याकडे लक्ष जाताच, त्यांनी अगदी सिंहासनाच्या पायरीजवळ येण्याचा आम्हाला हुकूम केला व पोशाख देऊन आम्हांला तत्काळ रजा दिली. थोड्याच वेळ आम्ही सिंहासनासमोर होतो.”

    सिंहासन हा माझ्या अभ्यासाचा आणि आवडीचा विषय आहे. उपरोक्त संकलन हे माझ्या पुस्तकातील कच्च्या मसुद्याचा भाग आहे. जो आज शिवराज्याभिषेक दिनाच्या निमीत्ताने आपल्या समक्ष प्रस्तुत केला आहे. वरील सर्व मजकूर हा छपाईच्या प्रक्रियेचा आणि प्रताधिकारचा भाग असल्याने त्यामध्ये बदल व दुरुस्ती होवू शकते. तसेच सदरील मजकूराचा वापर लेखाकाच्या परवानगी शिवाय करणे उचित ठरणार नाही. 

    संदर्भ –

    • ऐतरेय ब्राह्मण,
    • परशुराम महादेव लिमये, भारतीयांच्या शासनपध्दति व शासनविषयक कल्पना (१९२८)
    • डॉ. विद्याधर विश्वनाथ भिडे, ब्राह्मणकालीन समाजदर्शन, त्रैमासिक भारत इतिहास संशोधक मंडळ (वर्ष ५२, अंक१-४, १९७४), ऐतिहासिक संकीर्ण साहित्य खंड-१५, पृष्ठ २०.
    • Martin Hang, Aitareya Brahmanam of Rigveda (1922)
    • Edited by Shri. V. S. Bendrey, Coronation Of Shivaji The Great
    • वशिष्ठ संहिता
    • Edited by B. K. APTE, Chhatrapati Shivaji Coronation Tercentenary Commemoration Valume,
    • गागाभट्ट (मराठी विश्वकोष)
    • विष्णूधर्मोत्तर पुराण
    • श्री शिवराज्याभिषेक प्रयोगः
    • हिंदूपदपादशाहीचे सिंहासन

    टीप – सदर लेखातील मते, विचार आणि लेखाची मांडणी ही संबंधित लेखकाची आहे.

  • वैभवशाली उस्मानाबाद

    वैभवशाली उस्मानाबाद

    देशासह जगातील इतिहास पाहता आपल्याला काही प्राचीन संस्कृती उदयास आलेल्या दिसतात. त्यात इजिप्त, रोम, भारत, युरोप इत्यादी देश प्रामुख्याने आहेत. त्यात भारतामध्ये पाच हजार वर्षांपूर्वी प्राचीन अशी विकसीत व पुढारलेली सिंधू संस्कृती नांदत होती हे उत्खननातून सप्रमाण सिद्ध झाले आहे. या संस्कृतीची ठिकाणे ही आजच्या पाकिस्तानमधील मोहोंजोदाडो व भारतातील राखीगढी, लोथल (गुजरात) इत्यादी भागात असून उर्वरित भागात हिची ग्रामीण संस्कृती बघायला मिळते.

    काळाच्या पडद्याआड जेव्हा ही संस्कृती गेली, त्यावेळी भारतात वेगवेगळी गणराज्य, जनपद व महाजनपद निमार्ण झालेली दिसतात. त्यातीलच अश्मक व मुलक जनपदे ही महाराष्ट्रात होती असे दिसते. त्यानंतर इथे इ. स. पूर्व 230 ते इ. स. 230 अशी 460 वर्ष राज्य करणारा सातवाहन राजवंश राज्य करताना दिसतो. या राजघराण्याची राजधानी पैठण, तर आर्थिक राजधानी उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर (पूर्वीचे तगर) ही होती. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्याला ज्ञात असा दोन ते सव्वादोन हजार वर्षाचा वैभवशाली असा इतिहास लाभला आहे.

    अगदी रामायणात उल्लेख असलेली स्थळे ही उस्मानाबादच्या बालाघाट पर्वत रांगेत असून श्रीराम वनवासामध्ये असताना येरमाळा येथे रामाची परीक्षा घेण्यासाठी देवी पार्वतीने घेतलेले सीतेचे रूप तर श्री रामाने मातेचे जाणलेले मूळ रुप त्यावरून तू-का-आई असा केलेला उल्लेख, यावरून नंतर आपभ्रंश होऊन रूढ झालेले तुकाई नंतर पडलेले देवीचे नाव येडाई तर आता प्रचलित असलेले येडेश्वरी ; त्याचप्रमाणे परशुरामाशी ही सम्बधित असलेली देवी म्हणून प्रसिद्ध असलेले हे ठाणे ; तर तुळजापूर येथून श्री रामाला लंकेचा मार्ग दाखवणारी व वरदान देणारी देवी म्हणजे श्री रामवरदायनी देवी ही आपल्याला महाकाव्यातील प्रसंगापर्येंत मागे घेऊन जाते. असा वैभवशाली व प्राचीन वारसा सांगणारा उस्मानाबाद जिल्हा व येथील ऐतिहासिक स्थळे, प्राचीन तीर्थक्षेत्रे, दुर्ग, मंदिरे, लेण्या, दर्गे व मशिदी नक्कीच अभ्यासकांच्या, पर्यटकांच्या, कवी, लेखक, भक्तांची मने जिंकतील व वारंवार आपल्याकडे खेचतील हे मात्र नक्की.

    हवा पाणी व तुळजाभवानी याच्या ही पुढे उस्मानाबाद जिल्ह्याला प्राचीन असा वैभवशाली इतिहास लाभला आहे. हा सर्व इतिहास या बालाघाटातील दरीखोऱ्यात मंदिरांच्या, दुर्गांच्या , शिल्पांच्या , गडकोटांच्या, गढी-वाड्यांच्या, लेण्यांच्या माध्यमातून सर्वांना खुणावत आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचा जेंव्हा आपण इतिहासाच्यादृष्टीने विचार करतो तेंव्हा आपल्याला सातवाहन काळाच्या उदयापासून विचार करावा लागतो प्राचीन पुरातत्त्वीय अवशेष आपल्याला या काळापासून सापडतात. त्यामुळे या जिल्ह्यातील प्राचीन इतिहास दोन हजार वर्षांपूर्वीपासूनचा आहे हे सप्रमाण सिद्ध झाले आहे. याचा प्रत्यय आपण जेंव्हा तेर या परिसरात फिरतो तेव्हा तेथील पुरातत्त्वीय अवशेषावरून सहज कळून येतो.

    भारतातील सर्वात मोठे असलेले साम्राज्य म्हणजे मौर्य वंशाचे साम्राज्य, हे देखील या भागात राज्य करीत होते. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने देशाच्या वेगवेगळ्या भागात धर्मप्रसारक पाठवले होते त्यातील धर्ममहामात्र हा महाराष्ट्रात आलेला होता. विदर्भात तसेच महाराष्ट्राच्या इतर भागात या धर्म प्रसारकांनी कसा धर्म प्रसार केला हे महावंस मधील गाथेतील पुढील पंक्तीवरून कळून येईल.

    महारट्ठं इसी गनत्वा सो महधम्मरकिखतो |
    महानारदकस्सपाव्हँ जातकं कथयी तहिं ||
    मग्गफलं पापुणींसु चतुरासिति सहस्सका |
    तेरसं तु सहस्सानि पब्बजिंसु तदन्तीके ||

    अर्थ – तो महात्मा महाधर्मरक्षित महाराष्ट्रात गेला आणि तेथे त्याने महानारदस्सप जातकाची कथा सांगितली. तेव्हा चौऱ्यांशी हजार लोक बौद्ध मार्गाचे फल प्राप्त करते झाले आणि तेरा हजार लोकांना त्याने भिक्षु केले.

    त्यानंतर इ. स. पुर्व 230 ते इ. स. 230 असे चारशे वर्षाच्यावर या सातवाहन वंशाने महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक या भागात राज्य केले. त्यांची मुख्य राजधानी ही पैठण तेव्हाचे प्रतिष्ठान, तर आर्थिक राजधानी उस्मानाबाद जवळील तेर तेव्हाचे तगर ही होती. सातवाहनानंतर या इकडील मराठवाडा व इतर प्रदेशात अभिर, शक, वाकाटक, बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट, कल्याणी चालुक्य, शिलाहार, यादव, बहमनी, आदिलशाही, निजामशाही, मोगल व मराठा व शेवटी हैद्राबादचा निझाम यांनी राज्य केले.

    Periplus of Erythrean sea या प्राचीन पुस्तकात गुजरात येथील भरोच, तर महाराष्ट्रातील पैठण व उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर या गावाचा उल्लेख या भागाचे प्राचीनत्त्व सिद्ध करतो. तसेच टॉलेमी ( लॅटिन नाव क्लॉडियस टॉलेमस ) हा ग्रीक भविष्यवेत्ता, भूगोलतज्ञ तेर विषयी त्याच्या प्रवासवर्णनात उल्लेख असा करतो की,

    ही नगरी समुद्रकिनाऱ्यापासून आत असून अरियाके या प्रदेशात आहे. तगरची दिशा सांगताना तो पुढे लिहितो कि, तगर सिरी टॉलेमाओस (सातवाहन सम्राट पुलुमावी) या राजधानी बैथन (पैठण) च्या इशान्येस आहे. (भारतातील भूगोल बद्दल जास्त माहिती नसल्याने तेर च्या ठिकाणाबद्दल बऱ्याच अभ्यासकांची व त्याची माहिती थोडी चुकीची ठरली या मुळे बऱ्याच अभ्यासकांना तेर लवकर शोधता आले नाही मग हळूहळू तेर स्मृतीपटला वरून दूर जात राहिले.)

    हस्तिदंती तगर लक्ष्मी

    त्याचप्रमाणे सातवाहन काळातील तीस नगरांना लाकडी तटबंधी असलेले उल्लेख ही मिळतात. त्यातील एक तटबंदी असणारे नगर म्हणजे तेर हे होय. याचे पुरातत्त्वीय पुरावे देखील उपलब्ध झालेले आहेत. त्याचप्रमाणे रोम या साम्राज्याशी तेरचे व्यापारी सम्बद्ध होते, हे येथील मद्यकुंभ, हस्तिदंत मणी, बांगड्या, गोणपाट, खेळणी, बुट्याचे कापड, नाणी, हस्तिदंती असलेली प्रसिद्ध असलेली बाहुली तिला तगर लक्ष्मी म्हटले जाते, तर अशीच एक बाहुली इटली जवळील पोम्पे येथे मिळाली आहे. तिला तिथे भारतीय लक्ष्मी म्हटले जाते. ह्या बाहुल्या तत्कालीन आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या अनुषंगाने पुरावा म्हणून महत्त्वाच्या आहेत.

    त्रिविक्रम मंदिर, तेर

    तेर येथून होणारा प्राचीन व्यापार हा पैठणमार्गे गुजरातला जात होता. त्यामुळे दक्षिण व पुर्व भारतातून सार्थवाहक म्हणजे व्यापारी, प्रवासी हे आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू इत्यादी प्रदेशातून या ठिकाणी येत. त्यामुळे सातवाहन काळातील इकडच्या प्रदेशातील व्यापारी मार्ग हे आज ही पाहिला मिळतात. उदा. वैराग जवळ असणाऱ्या धामणगावाजवळ जकातीचा प्राचीन रांजण याची साक्ष देत आज ही सुस्थितीमध्ये आहे. तर तेर येथील त्रिविक्रम मंदिरासारखी रचना असणारे मंदिर हे आंध्र प्रदेशातील किनारी भागात असलेल्या चेझरला याठिकाणी आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही मंदिराच्या बांधकामात असणारी साम्यता म्हणजे विटांचा आकार, लांबी रुंदी इत्यादि सर्व सारखेच आहेत याचाच अर्थ या दोन ठिकाणी असणारे व्यापारी व सांस्कृतिक संबंध होय.

    आज ही उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबाद, तुळजापूर, तेर तसेच नळदुर्ग किल्ल्याच्या पुर्व तटबंदीच्या बाहेरील बोरी नदीच्या बाजूला सातवाहनकालीन वसाहती सापडल्या असून आणखी बऱ्याच ठिकाणी त्या सापडत आहेत. हे सर्व सांगायचे कारण म्हणजे, या परिसरात प्राचीन काळात वेगवेगळे राजवंश राज्य करत असून या भागातील लोकांचा इतर व्यापारी केंद्राशी व्यापारी देवाण-घेवाण होत होती. तेर येथून गुजरातमार्गे, जगभर तलमवस्त्र, गोणपाट, हस्तीदंती बांगड्या, कानातील, गळ्यातील माळा, कज्जल शलाका या व अशा अनेक वस्तू निर्यात केल्या जात व तिकडील देशातुन उच्च प्रतीची दारू इकडे मागवली जात, हे येथील उत्खननात सापडलेल्या मद्यकुंभावरून कळून येते.

    उस्मानाबाद जिल्हा बालाघाटाच्या डोंगर रांगेत वसलेला असल्याने येथील गिरीशिखरात बांधलेली मंदिरे नक्कीच बघण्यासारखी आहेत. यात भूम तालुक्यातील माणकेश्वर शिवमंदिर स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे. जिल्ह्यातील प्रमुख सर्व मंदिरे ज्यात माणकेश्वर, उमरगा येथील महादेव मंदिर, जागजीचे महालक्ष्मी मंदिर, तुळजापूरचे श्री तुळजाभवानी मंदिर, त्याचप्रमाणे सोनारी येथील श्री काळभैरव नाथाचे मंदिर, कुंथलगिरीचे जैन मंदिर, श्री. खंडोबा मंदिर, तेर येथील कालेश्वर मंदिर इत्यादि मंदिरांचा जेव्हा आपण अभ्यास करतो किंवा त्या मंदिरांना भेट देतो, त्यावेळी येथील मंदिरांची अनोखी व वैशिष्ट्यपूर्ण शैली व त्यातून दिला गेलेला संदेश नक्कीच अद्वितीय असा आहे हे समजते. उदा. उस्मानाबाद-बीड महामार्गावरील कुंथलगिरी येथील जैन मंदिराच्या शिखरावर एकाच पाणीपत्रामध्ये वाघीण व गाय पाणी पीत असलेले दाखवलेले आहे याचाच अर्थ भिन्न प्रकृती असणारे पशु सुद्धा गुण्यागोविंदाने रहाताना दिसतात हे जैन धर्मातून अहिंसेच्या तत्त्वाला दर्शीवलेले आहे.

    माणकेश्वर शिवमंदिर

    माणकेश्वर येथील शिवमंदिरच्या बाह्यभागावर 450 पेक्षा जास्त देवदेवतेची व सुरसुंदरीची शिल्पे असून यातील एक शिल्प हे चिनी प्रवासीचे आहे. इथे या शिल्पासाठी वापरलेला दगड ही पांढरट रंगाचा आहे या शिल्पावरून आपल्याला त्यावेळी भारताचा होणारा विदेशी व्यापार व वेगवेगळ्या देशातून येणारे व्यापारी यांची माहिती होते. हे उत्तर चालुक्यकालीन मंदिर असून भूमिज पद्धतीचे आहे. तर उमरगा येथे असणारे महादेव मंदिर हे मुळात विष्णू मंदिर आहे व मंदिराच्या देवकोष्टात असणाऱ्या विष्णूच्या रुपात बुद्ध देखील दाखवला आहे. याच मंदिराच्या पायावर असणारी मैथुन शिल्पे खजुराहोच्या तोडीची आहेत.

    महाराष्ट्राची कुलस्वामिनी व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलदेवता श्री तुळजाभवानी देवीचे मंदिर हे उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असून मंदिर परिसर, होम, तीर्थे, शेजघर, तुळजापूर मध्ये असणारे मठ येथील नवदुर्गा या सर्वांना पाहून हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे शाक्तपीठ आहे हे लक्षात येते. देवीचे वर्षभर वेगवेगळे उसत्व पार पाडले जातात देश विदेशातून भक्त भाविक देवीला शक्ती मागण्यासाठी येत असतात. पानिपतची प्रसिद्ध अशी जी तिसरी लढाई मराठे व अब्दालीमध्ये झाली तिच्या विजयासाठी सदाशिव भाऊ पेशवे यांनी तुळजाभवानीला नवस मागितलेला असून तो नगारा देऊन नंतर पूर्ण ही केलेला आहे. तसेच मोगल बादशहा आलमगीर औरंगझेब स्वतः एक आठवडा तुळजापुरात वास्तव्यास होता. अशा व अनेक रोमहर्षक हकीकतीने तुळजापूरचा इतिहास भरलेला आहे.

    हिंगलज माता, हिंगळजवाडी

    त्यानंतर तेर जवळील हिंगळजवाडी येथे श्री. हिंगलज देवीचं मंदिर असून या देवीचे मुख्य ठाणे पाकिस्तानातील बलुचीस्थान भागातील मकरान पर्वत रांगेत आज देखील सुस्थितीमध्ये आहे. तेरच्याच पुढे जागजी या गावी श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर असून येथील महालक्ष्मी ही मेंढ्यावर बसलेली आहे . येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवी मंदिर हे देखील प्रमुख तीर्थक्षेत्र असून देवीला नवस मागण्यासाठी दूरवरून भाविक येरमाळा येथे येतात. महाराष्ट्रातील शाक्त संप्रदायाचा सर्वात मोठा पट्टा हा उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. वाशी पासून नळदुर्ग पर्येंत असंख्य देवीची मंदिरे आपणास पहायला मिळतात.

    देवगिरीच्या यादवांच्या पतनानंतर तुघलकांच्या काळात उस्मानाबाद जिल्हा खऱ्या अर्थाने इस्लामिक राजवटीखाली आला राजकीय राजवटीबरोबर धर्म ही ह्या भागात मशिदी, दर्ग्याच्या व पीर यांच्या रूपाने पसरलेला दिसतो. खुद्द उस्मानाबाद येथे हजरत ख्वाजा शमसोदिन गाजी रहे यांचा दर्गा असून याचे बांधकाम मुहंमद तुघलकच्या काळात झालेले आहे. बांधकाम झालेला शिलालेख दर्ग्यात पहायला मिळतो. दरवर्षी दर्ग्याचा उरूस भरला जातो त्यात सर्व जातिधर्मातील लोकांचा मान असतो व हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून या उरुसाकडे पाहिले जाते. याचप्रमाणे तुळजापूर तालुक्यातील काटी या गावी बुर्हाण निजामशहाच्या काळातील सुंदर अशी मस्जिद असून ती मेहरच्या पैशाने बांधलेली आहे. या मस्जिदीमध्ये कुराणातील आयात कोरलेल्या आहेत त्या डोळ्याने दिसत नाहीत जेंव्हा ओला कपडा यावर पुसावा तेव्हा हा मजकूर स्पष्ट दिसतो.

    मंदिरे, लेण्या, मशिदी त्याचप्रमाणे काही महत्त्वाच्या गढ्या व किल्ले हे उस्मानाबाद जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्रातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला हा उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग या ठिकाणी आहे. मूळच्या कल्याणी चाल्युक्यांच्या काळात बांधण्यात आलेला किल्ला नंतर बहमनी काळातील सुल्तानाकडे गेला व जेव्हा बहमनी सल्तनतीचे पाच तुकडे झाले त्यातील विजापूरच्या आदिलशहाने हा किल्ला बांधला. या किल्ल्यातील सर्वात आकर्षक वास्तू ही इ. स. 1613 मध्ये मीर मीर इमादिन या वास्तूविशारदाने बांधलेले धरण होय व या धरणात सुंदर असे केलेले पाणी महालाचे बांधकाम होय. त्याचप्रमाणे पाण्याच्या दाबाचा उपयोग करून टरबाईनच्या सहाय्याने पीठ दळण्याची चक्की याच धरणाच्या आत केलेली आहे. हे या किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य होय. तसेच किल्ल्याला 114 च्या वर बुरुज असून प्रत्येक बुरुजाची रचना व आकार वेगळा आहे व तटबंदीची लांबी 3 किमी भरेल इतकी आहे. त्याचप्रमाणे किल्ल्यात बारदारी, उपळ्या बुरुज, ( या उपळ्या बुरुजावर एक खोली आहे त्यात दुर्मिळ असे रायनोकोमा हार्डविकी हे शेपटी असणारे वटवाघूळ पाहिला मिळते ), बारुदखाना, जामा मस्जिद, हमामखाना, दरबार हॉल, नऊ बुरुज, रंगमहाल इत्यादि वास्तू आवर्जून बघण्यासारख्या आहेत. नळदुर्ग किल्ल्याच्या बाजूला रणमंडल हा जुना किल्ला असून यातील हत्तीदरवाजा बघण्यासारखा आहे. काही वैशिष्ट्यपूर्ण अशी शिल्पे इथे पहायला मिळतात. उदा. बाहेरील तटबंदीवर गंडभेरुंड, सहा माशांचे शिल्प, व्याल तसेच आतील बाजूला मुख्यदरवाजासमोर दन्त असून आतील दरवाजावर व्याल, हत्ती इ. शिल्पे आहेत.

    नळदुर्ग जवळील अणदूर हे श्री खंडोबाचे एक जागृत देवस्थान आहे. मूळ मंदिर मैलारपूर येथे आहे पण मंदिर विटंबना झाली म्हणून येथील देव काढून बाजूलाच एका नवीन मंदिरात बसवला गेला. या देवस्थानात सव्वा दहा महिने देव अणदूर येथील मंदिरात असतो, तर पावणेदोन महिने मैलार येथील मंदिरात असतो. यावेळी इथे मोठी यात्रा भरते. महाराष्ट्रासह दक्षिण भारतातून इथे भाविक येतात. मैलारपूर येथील मंदिरासह अणदूर येथील देवस्थानाला पुण्यशोल्क अहिल्याबाई होळकर व राजर्षी शाहू महाराज यांनी देणग्या दिल्या आहेत. अणदूर येथील जिजामाता प्रवेशद्वाराजवळ मराठेशाही चे सरदार हिंमतबहाद्दर श्री उदाजी चव्हाण यांची समाधी आहे.

    जिल्ह्यातील दुसरा भुईकोट किल्ला म्हणजे परंड्याचा किल्ला होय. हा दुहेरी तटबंदी असणारा व मुख्य असे 26 बुरुज असलेला मजबूत असा हा किल्ला प्रसिद्ध आहे तो येथील असणाऱ्या तोफ गोळे आणि तोफांमुळे. इतिहासातील प्रसिद्ध अशी जी विजयनगर व पाच शाह्यांत तालीकोट येथे झालेली जी लढाई होती त्यात निजामशहाने आणलेली प्रचंड अशी मलिक ऐ मैदान तोफ होती, ती युद्धानंतर परंडा किल्ल्यात ठेवली होती नंतर ती आदिलशहाने सरदार मुरार जगदेवास विजापूर येथे हलवण्यास सांगितली. तेव्हा या तोफेला दोनशे बैलाकरवी आणले गेले. हा कल्याणी चालुक्यांच्या ताब्यातील प्रदेश होता पूर्वी या भागाला पलियंड, प्रत्यण्डक अशी नावे होती नंतर याचे परंडा असे नाव रूढ झाले. या किल्ल्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे याचा मुख्य दरवाजा दोन बुरुजामध्ये नसून प्रत्यक्ष बुरुजामध्ये केला आहे. तसेच किल्ल्यात अत्यंत सुंदर अशी नृत्य गणेशाची प्रतिमा असून काही वीरगळी, वेताळ शिल्प, पार्श्वनाथ शिल्प, तीर्थंकर मूर्ती, हनुमान, हत्ती, व्याल, नृसिंह शिल्प व मस्जिद आणि लतावेलीची सुंदर नक्षीकाम केलेली पहायला मिळते. त्याचप्रमाणे भव्य अशी मोठी बारव किल्ल्यामध्ये आहे. किल्लात श्री. शहाजी राजे व जिजामाता यांचा काही काळ मुक्काम देखील होता. परंडयाला मराठवाड्याचे द्वार देखील म्हंटले जाते. काही काळ हा किल्ला निजामशाहीची राजधानी राहिलेला आहे.

    परंडयाच्या जवळच डोमगाव येथे समर्थ रामदास स्वामी चे पट शिष्य श्री. कल्याण स्वामी अर्थात अंबाजी कृष्णाजी कुलकर्णी यांचे दोनशे पन्नास वर्षांपूर्वीचे समाधीमंदिर आहे. सज्जन गडावरून निघून कल्याण स्वामी रामदासी कार्यास त्यावेळी असणाऱ्या हमस्त्यावरील डोमगावी येथे आले व तेथून त्यांनी कार्याला सुरवात करून मोठा शिष्यवर्ग जमावला बाजूलाच असणाऱ्या सिना नदीला त्यांनी श्रमहरिणी असे नाव देऊन तिची आरती देखील रचली. समर्थ रामदासांनी संगीतलेला दासबोध ग्रंथ हा कल्याण स्वामींनी लिहिला आहे त्या ग्रंथाची आद्य प्रत आज ही डोमगाव येथे असून कल्याण स्वामींची जपमाळ ही आज मोठ्या आस्थेने जपून ठेवली आहे. अक्षर कसे असावे हे दासबोध ग्रंथ पाहून कळेल. इ. स. 1714 रोजी परंडा येथे रामकथा पुर्ण करून श्री. कल्याण स्वामींनी देह ठेवला त्यांची समाधी डोमगाव इथे बांधण्यात आली.

    जैन मंदिर – सावरगाव, तुळजापूर

    डोमगावाशेजारीच महाराष्ट्रातील अनेक घराण्यांचे कुलदैवत असणारे श्री काळभैरवानाथाचे मंदिर आहे. मंदिर बघण्यासारखे असून मंदिराशेजारी गंगातीर्थ, लोहतीर्थ, दीपमाळ, भद्रकाली देवी मंदिर, नाथ संप्रदायाचा मठ, जैन मंदिर अशी ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.

    किल्ले व मंदिरापाठोपाठ उस्मानाबाद जिल्ह्यात मध्ययुगीन गढी-वाडे पाहण्यासारखे आहेत. यातील महत्त्वाच्या गढ्या म्हणजे तुळजापूर जवळील अपसिंगा , कामठा व उस्मानाबाद जवळील आळणी गावाची गढी स्थापत्यशास्त्राच्यादृष्टीने पाहण्यासारख्या आहेत. अपसिंगा गढीचे महाद्वार एखाद्या किल्ल्याच्या महाद्वारासारखे आहे, तर कामठा येथील गढीमधील एका बुरुजामध्ये निजाम काळातील फाशी देण्यासाठी लावलेला वध स्तंभ आज ही सुस्थितीत पहायला मिळतो. आळणीची गढी पूर्णपणे विटांची असून यातील एक नऊ पाकळ्यांचा बुरुज जो कि नळदुर्ग किल्ल्याला आहे त्या पद्धतीचा आहे . तसेच याच आळणी समोरील गडदेवदरी या गावात एक छोटे खानी किल्ला किंवा ठाणे आहे. परंतु आज त्याचा बहुतांश भाग कोसळला आहे.

    खुद उस्मानाबाद शहराला ही प्राचीन , मध्ययुगीन व आधुनिक अशी इतिहासाची किनार लाभली आहे उस्मानाबाद पासून पंचेवीस किमी अंतरावर असलेल्या प्राचीन काळातील भरभराटीला आलेल्या तेरमुळे उस्मानाबाद शहरातील जुन्या भागात दोन हजार वर्षांपूर्वीची सातवाहन काळातील सोळा एकर वरील वसाहत म्हणजे तेंव्हाचे गाव असून आज ही तिथे मणी, विटा, खापरे इ. सापडतात. त्यामुळे येथील गिरीशिखरात तेरला जाणाऱ्या व्यापारी मार्गावर एकूण तीन लेण्या असून पहिली लेणी उस्मानाबादच्या शहराच्या दक्षिणेस वैराग रोड वर असून तिचे नाव चमारलेणी आहे. या लेण्या पाचव्या शतकातील आहेत व या लेण्यांची नोंद ही बॉम्बे गँझेटरमध्ये आहे. या बौद्ध लेण्या असून येथूनच एक किमी अंतरावर नागनाथ मंदिर परिसरात लाचुंदर लेणी समूह आहे. तर तिसरा मोठा लेणी समूह म्हणजे शहरापासून पश्चिमेस पाच किमी अंतरावर असलेला धाराशिव लेणी समूह होय. ही लेणी सहाव्या शतकात कोरलेली असून प्राचीन करंडक चरयु या ग्रंथात या लेण्यांचा उल्लेख आहे. ब्रिटिश भारताचे पुरातत्त्व खात्याचे महानिर्देशक जेम्स बर्जेस यांनी या लेण्यांचा एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात शोध लावला. या समूहात एकूण सात लेण्या असून काही बौद्ध लेण्यांचे नंतर जैन लेण्यात रूपांतर केले गेले आहे क्रमांक दोनची मुख्य लेणी असून गर्भगृहात पार्श्वनाथाची सिंहासनावरील पद्मासनातील वज्रलेप दिलेली मुर्ती असून पाठीमागे सात फणा असलेले नाग वर गंधर्व , बाजूला चमार धारक व खाली हरीण, सिंह शिल्पित केलेले आहेत. बाजूलाच पाण्याचे कुंड बघण्यासारखे आहे. हा अवर्षणाचा भाग असल्याने पाण्याची कमतरता सतत असल्याने व उन्हाळ्यात पाणी मिळत नसल्याने, हे कुंड डोंगर पोखरून बनवले गेले आहे. भर उन्हाळात देखील या कुंडात पाणी असते. सातव्या क्रमांक ची लेणी ही हिंदू लेणी असून या लेणीच्या दर्शनी भागावर श्री कृष्णाच्या बाळलिला व काही महत्त्वाचे प्रसंग शिल्पित केलेले आहेत व ते प्रत्येक चौकोनात असून बाजूला मकर प्रणाल, सिंह प्रणाल कोरलेले दिसतात. या लेणी समोर उत्तर पेशवेकालीन शिवगुरु महाराज यांचे समाधी मंदिर आहे. शहरात तुघलकाच्या काळातील मोठा दर्गा असून त्यापाठीमागे धाराशिवची ग्रामदेवी श्री धारासुरमर्दिनीची मंदिर आहे. दरवर्षी नवरात्र महोत्सव मोठ्या थाटामाटात केला जातो आणि दसऱ्या दिवशी गावातील लोक शस्त्र घेऊन देवी मंदिरात दर्शनासाठी जातात.

    असा हा संपूर्ण उस्मानाबाद जिल्हा, आपल्या कवेत प्राचीन काळापासूनचा वैभवशाली इतिहास घेऊन आज ही उभा आहे. इथल्या इतिहासाला, इथल्या पराक्रमाला, इथल्या जिद्दीला , येथील वास्तूंना व वैभवशाली वारशाला प्रतीक्षा आपल्या भेटीची आहे.

    टीप – सदर लेखातील मते, विचार आणि लेखाची मांडणी ही संबंधित लेखकाची आहे.

  • इतिहासातील नाण्यांचे बनावटीकरण

    इतिहासातील नाण्यांचे बनावटीकरण

    बनावटिकरण किंवा खोटेपणा हा आपल्याला आज प्रत्येक गोष्टीमधे पहावयास मिळतो आणि चलनही त्याला अपवाद नाही. चलन नवे असो किंवा जुने त्याचे बनावटिकरण होतेच. आज आपण वापरत असलेल्या नाण्यांचे, नोटांचे देखील बनावटीकरण होते. त्याचे हेतु वेगवेगळे असु शकतात. पण या सर्वात एक उद्देश सारखा आहे आणि तो म्हणजे नफा कमविणे. नविन नाण्यांच्या बनावटीकरणामुळे देशाचे आर्थिक स्थैर्य ढासळु शकते आणि ऐतिहासिक नाण्याच्या बनावटिकरणाने इतिहासाला तडा जाऊ शकतो. आज चलनात असलेल्या नाण्यांच्या बनावटीकरणाबरोबरच ऐतिहासिक नाण्यांचे देखील बनावटीकरण होते. ऐतिहासिक चलनाबाबत उत्सुकता आणि संग्राहकांची वाढती मागणी हे बनावटिकरणाचे कारण बनले असल्याचे आपल्याला दिसते. आज चलनात असलेल्या नाण्यांचे, नोटांचे होत असलेले बनावटीकरण हे आत्ताच होते आहे का ? याआधीहि बनावट नाणी होती का ? प्राचीन काळीही बनावट नाणी बनवली जात का ? हे प्रश्न या पाठोपाठ आपल्या मनात येऊ शकतात. याच प्रश्नांची उत्तरे जाणुन घेण्याचा प्रयत्न आपण या लेखाच्या माध्यमातुन करुया. 

    फसवण्याच्या किंवा जास्तीचा फायदा करुन घेण्याच्या हेतुने अनुकरण करुन बनवलेल्या वस्तुला बनावट म्हटले जाते. चलनाबद्दल बोलायचे झाले तर अधिकृतरित्या न बनवलेल्या किंवा न टांकसाळीत केलेल्या चलनास आपण बनावट म्हणु शकतो. पण त्याला बनावट म्हणावे की नाही हे बनवणाऱ्याच्या उद्देशावरुन ठरवले जाऊ शकते.

    बनावट चलन बनवण्याची प्रक्रीया काही आज आपल्याकडे जन्माला आलेली नाही, सत्य तर असे आहे की जेव्हापासुन चलन भारतात सुरु झाले त्या साधारण इ.स.पु 600 पासुनच आपल्याकडे खोटी नाणी बनायलाही सुरुवात झाली. प्राचीन काळातील लेखकांच्या लेखनात या खोट्या नाण्यांबद्दल उल्लेख मिळतात, कौटिल्याच्या अर्थशास्त्रातही बनावट नाण्यांबद्दल उल्लेख दिलेले आहेत. अर्थशास्त्रात कौटिल्य म्हणतात की,

    • नाणी तपासानंतर शुद्ध घोषीत केलेली सोन्याची नाणीच कर म्हणुन स्विकारावीत.
    • खोटी किंवा बनावट ठरवलेल्या नाण्यांचे तुकडे करावे.
    • जो ही अशी खोटी नाणी बनवेल त्याला कडक शिक्षा केली जाईल.

    पुढे राज्याच्या सुवर्णकाराची कर्तव्ये या पाठात ते सांगतात ती अशी –

    • राज्याच्या सुवर्णकाराला सोने चांदि यांबद्दल पुर्ण ज्ञान असले पाहिजे. सुवर्णकारास हिरे, मौल्यवान दगड (मणी), मोती, शंख-शिंपले आणि नाणी यांच्या प्रजाती, वैशिष्ट्ये, रंग, वजन आणि निर्मितीबद्दल पुर्ण माहिती असली पाहीजे. 
    • जर एखाद्या व्यक्तीने बनावट नाणे तयार केले किंवा ते स्वीकारले किंवा त्याचे आदानप्रदान केले तर त्याला एक हजार पन दंड ठोठावला जाईल; जर कोणी कोषागारात बनावट पैसे घेईल तर त्याला अवश्य जिवे मारावे.

    ही माहीती कौटील्याने खोट्या नाण्यांबद्दल त्याच्या अर्थशास्त्रात दिलेली आहे. पाली भाषेत असलेल्या बुद्ध साहित्यातही नाण्यांबद्दल सांगीतले आहे की, नाणी बनवणाऱ्या सुवर्णकारास नाण्यांबद्दल त्याच्या प्रजाती, वैशिष्ट्ये, रंग, वजन आणि निर्मिती बद्दल पुर्ण माहीती असते जी सामान्य माणसाला नसते.

    भारतात प्राचीन, मध्ययुगीन तसेच अर्वाचीन या तिनही काळात बनावट नाणी बनत आलेली आहेत, त्या त्या काळात त्यावर नियंत्रण करण्यासाठी उपायही केलेले आहेत पण या गोष्टिवर कुठल्याही काळात पूर्ण आळा बसलेला नाही.

    प्राचीन काळात लिहीलेल्या याज्ञवल्क्य-स्मृती मधे देखील बनावट नाण्याबद्दल एक उल्लेख आहे, त्यात नाणे बनवणाऱ्याला कूटक्रितनाणक असे म्हटलेले आहे. आणि हि नाणी तपासणाऱ्याला परिक्षी असे म्हटलेले आहे. नाणकशास्त्रातील नाणक या शब्दाचा देखील यात उल्लेख आलेला आहे. प्राचीन अथवा मध्ययुगीन काळात सोने व चांदी धातुमधे देखिल बनावट नाणी बनत. या बनावट नाण्यांमधे विविध स्वस्त धातुंची भेसळ करुन किंवा चांदिचे नाणे असल्यास ते तांब्याचे बनवून व त्यावर चांदिची परत चढवून वगैरे हि समकालीन बनावट नाणी बनवली जात. प्राचीन काळातील काही नाणी सापडलेली आहेत कि जी मुळ नाणी तांब्याची करुन त्यावर चांदीचा मुलामा चढवलेला आहे. 

    इ. स. पू 200-300 मधील हे आहत प्रकारातील नाणे. ही अस्सल आहत नाणी चांदी धातुची असतात. पण हे नाणं त्याकाळी नफा कमावण्याचा हेतुने आतुन तांबे धातुचे बनवून वरुन चांदीचा मुलामा दिलेला आहे. हा आहे प्राचीन काळातील बनावट नाण्याचा एक नमुना.!

    Courtesy – coincoin.com

    प्राचीन काळातील नाण्यांचा काही मातीच्या आवटी मिळालेल्या आहेत त्यादेखील बनावट नाणी बनवण्याच्या हेतुनेच केल्या असाव्या. नालंदा येथील उत्खननात कुशान आणि गुप्त नाण्यांच्या अशा काही मातीच्या आवटी सापडलेल्या आहेत, ज्या त्याकाळी सोन्यात भेसळ करुन कमी प्रतीची नाणी या आवट्यांद्वारे बनवली जात. पंजाबमध्ये यौधेय राज्याच्या नाण्यांच्या देखील अशा प्रकारच्या काही आवटी सापडलेल्या आहेत. या आवट्यांमधे धातु ओतुन नाणी बनवली जात असंत. चलनाचे बनावटीकरण फार प्राचीन काळापासुन चालु असल्याचे आपल्याला या पुराव्यांवरुन दिसुन येते. चलनाचे हे बनावटीकरण मध्ययुगीन काळातही चालुच होते. 

    मध्ययुगीन काळात बनावट नाणी बनवणे अत्यंत सोपे होते, नाणे अंतर्मुल्याधारित असल्याने वजनावरच किंमत ठरत असे आणि याचाच फायदा घेउन बनावट नाणी बनवणारे लोक धातुत भेसळ करुन त्यातुन नफा लाटत असत. 

    उदाहरण म्हणुन खालील औरंगजेबाचे नाणे.  अस्सल आणि बनावट अशी दोनही नाणी खाली दाखवली आहेत.

    Courtesy – Ashutosh Patil

    त्याकाळी कुणीतरी या नाण्यांची डाय बनवून किंवा चोरून स्वतःच तांब्याची नाणी बनवून त्यावर चांदीचा मुलामा चढवून (जेणे करून ती अस्सल वाटावीत) ती चलनात आणली. ही नाणी त्याकाळी किती लोकांना कळाली आणि किती काळ चालली ते माहिती नाही. नाण्याचे वजन अगदी बाकी रुपयांचे असते तेवढेच आहे 11 ग्राम. हे नाणे सुरत टांकसाळीच्या आवटी ने पाडलेले आहे. ही सर्व नाणी हातोडा डाय वर मारून बनवली जायची ज्याला इंग्लिश मध्ये Die struck Technique म्हणतात.

    औरंगज़ेब आणि त्यानंतरच्या मुघलांची नाणी अगदी सुटसुटीत आहेत. याच नाण्याबद्दल बोलायचं झालं तर नाण्यावर पुढील बाजूनी सिक्का झद दर जहान चू बद्र इ मुनीर बादशाह औरंगजेब आलमगीर लिहिलेले असून औरंगजेब आलमगीर या शब्दात नाणे पाडले ते हिजरी वर्ष 1098 म्हणजेच इ.स . 1686 दिलय. तर मागील बाजूनी झर्ब सुरत सनह 30 जुलूस मैमनत मानूस असून सनह 30 हे नाणे औरंगजेबाचे राजवर्ष 30 सुरु असताना पाडले असल्याचे दर्शवते.

    मुघलांच्या उतरत्या काळात विविध संस्थानिक राज्यदेखील भारतात राज्य करित होते. त्यातील अवध या राज्यात चांदीची रुपया नाणी चालायची. या नाण्यांचेही त्याकाळी काही प्रमाणात बनावटीकरण झालेले आहे. काही मातीच्या आवटी उपलब्ध झालेल्या आहेत ज्यावरुन आपण हे म्हणु शकतो. बनावट नाणी बनवण्यासाठी वापरात असलेली मातीची आवटी आणि अस्सल नाणे खाली दाखवलेले आहे. 

    यावरुन मध्ययुगीन काळातील नाण्यांच्या झालेल्या बनावटीकरणावर प्रकाश पडतो. बनावटीकरण ही समाजात घडणारी एक घटना म्हणुन याचे प्रतिबिंब हे समकालीन संत साहित्यातही पडलेले आहे. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांनी लिहीलेल्या अभंगातही बनावट नाण्यांचे काही उल्लेख आलेले आहेत. प्राचीन काळापासुनच समकालीन बनावट नाण्यांमधे एक प्रकार प्रचलीत आहे आणि तो म्हणजे भारी नाण्यासाठी हलक्या धातुचा वापर करुन नाणे बनविणे आणि त्यावर भारी धातुचा मुलामा चढवून अस्सल म्हणुन चलनात आणणे.

    तुकाराम गाथेत 3146 क्रमांकाच्या अभंगाची पहिली ओळ आहे,

    तांबियाचे नाणे न चाले खर्या मोले | जरी हिंडवीले देशोदेशी ||

    यात तुकाराम महाराजांच्या भोवताली अशी बनावट नाणी चलनात असावी आणि त्यावरुन तुकाराम महाराज म्हणतात की तांब्याच्या नाण्याला सोन्याचा किंवा चांदिचा मुलामा देवून तुम्ही लोकांना फसवन्याचा प्रयत्न कराल पण त्या त्या ठिकाणी त्याचे तज्ञ लोक आहेतच त्यामुळे तुमची योजना सफल होणार नाही आणि तुम्ही ते बनावट नाणे देशोदेशी जरी हिंडवीले तरी ते खऱ्या नाण्याच्या मुल्याने चालणार नाहि. अजुन एका ठिकाणी असाच उल्लेख येतो त्यात तुकाराम महाराज म्हणतात की –

    मुलाम्याचे नाणे | तुका म्हणे नव्हे सोने ||

    इथेहि महाराज तेच सांगतात की नाण्यास फक्त मुलामा दिलेला असेल तर ते अस्सल सोन्याचे होत नाही, त्यावर फक्त सोन्याचा मुलामा असतो आणि तो मुलाना निघाला तर त्याची सत्यता सर्वांसमोर येते. असे विविध संदर्भ साहित्यात आहेत.

    समकालीन बनावट चलनाचा अत्यंत संक्षिप्त स्वरुपात आढावा घेण्याचा हा प्रयत्न होता. इतिहासात चलनाच्या बनावटीकरणाचे असे अनेक संदर्भ आहेत. समकालीन परिस्थिती तसेच नफा कमावण्याच्या हेतुने झालेल्या बनावटीकरणाची माहिती आपल्याला या संदर्भांतून मिळते.

    संदर्भ

    • Nanak- a study, Manjiri Bhalerao.
    • Treasures of Gupta Empire, Shivleekumar Gupta.
    • Standard Guide to Coin Collecting, Asif Zumkhawalla.
    • Introduction to Indian Coin Forgeries, Shastri JC Philip.
    • Kautilyas Arthshastra, R. Shamasastry.
    • भारतीय सिक्के, अमितेश्वर झा.
    • नाणी, संग्रह आणि संग्राहक, आशुतोष पाटील.
    • https://coincoin.com/I069.htm

    टीप – सदर लेखातील मते, विचार आणि लेखाची मांडणी ही संबंधित लेखकाची आहे.

  • वारसा दत्तक योजना – स्मारक मित्र की वैरी

    वारसा दत्तक योजना – स्मारक मित्र की वैरी

    13 एप्रिल 2018 रोजी जाहीर झालेल्या लाल किल्ला दत्तक योजनेवर बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया सोशल मिडियामध्ये वाचायला मिळाल्या. त्यामध्ये बऱ्यापैकी अनेक लोकांचा नावडतीचा सूर होता. त्यात अनेक प्रतिक्रिया वारसा दत्तक योजना म्हणजे काय आहे हे माहित नसताना आलेल्या दिसत होत्या. राष्ट्रीय पर्यटन मंत्रालय आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने एकत्र येऊन वारसा दत्तक योजना (अपनी धरोहर, अपनी पेहचान – Adopt a Heritage) सार्वजनिक-खाजगी भागीदारीसाठी 2017 मध्ये जागतिक पर्यटन दिनी जाहीर केली आहे. वारसा दत्तक योजने अंतर्गत बरीच स्मारके आणि वारसा स्थळे देखरेख आणि व्यवस्थापनासाठी उपलब्ध करून दिली आहेत. अशीच अजून एक योजना 1996 पासून सुरु आहे, ती म्हणजे ‘राष्ट्रीय संस्कृती निधी’. या योजने अंतर्गत मूर्त-अमूर्त वारसा संवर्धनासाठी निधी दिला जातो. त्या योजनेमध्ये देखील एक मोठी यादी आहे. पुणे महानगरपालिकेने शनिवार वाड्याचे केलेले संवर्धन व देखरेख हे या राष्ट्रीय संस्कृती निधी द्वारेच केले आहे. तसेच हुमायूनची कबर (Humayun’s Tomb)चे संवर्धन आणि देखरेख – आगा खान ट्रस्ट आणि ओबेरॉय हॉटेल्स यांनी संयुक्तपणे केले. शिवाय अनेक वारसा स्थळांना या निधीमुळे जीवदान मिळाले आहे.

    खरंतर, या योजनांची उद्दिष्टे ही वारसा जतन आणि संवर्धन हीच असतात. फक्त त्याच्या अंमलबजावणीचे प्रकार वेगवेगळे आहेत, त्यामुळे प्रथम अश्या योजनांची उद्दिष्टे, प्रक्रिया, कालमर्यादा, परिणाम यांचा सर्वांगाने परामर्श घेणे गरजेचे असते. त्याकरिता वारसा दत्तक योजना नक्की काय आहे हे जाणून घेणे इष्ट ठरेल. वारश्यासंबंधी योजनेचा आढावा घेणारे बरेच लेख वाचण्यात आले, परंतु येथे मी पर्यटनाच्या दृष्टीने योजनेचा आढावा घेणार आहे.

    वारसा दत्तक योजनेची उद्दिष्टे –

    दत्तक घेतलेले वारसा स्थळ विकसित करून पर्यटनासाठी अनुकूल करणे, पर्यटनाला प्रोत्साहन देऊन, त्या वारसा स्थळाचा दिलेल्या मर्यादित वेळेत टप्प्याटप्प्याने विकास करून त्याचे सांस्कृतिक महत्त्व वाढविणे, हे प्रमुख उद्दिष्ट आहे.

    याशिवाय इतर काही उद्दिष्टे पुढीलप्रमाणे:

    • दत्तक घेतलेल्या वारसा स्थळावरील, पर्यटकांसाठी अत्यावश्यक असलेल्या मुलभूत सुविधांचा विकास करणे. जसे की, स्वच्छतागृहे, पाणपोई, वाहतूक व्यवस्था इत्यादी गोष्टींचा अंतर्भाव यात होतो.
    • पर्यटकांसाठी वारसा स्थळाची माहिती पुरविणे. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे माहिती पुरवठ्यामध्ये सुलभता आणणे.
    • स्थानिक लोकांकरिता, सांस्कृतिक मूल्यांवर आधारित रोजगार उपलब्ध करून देणे. जसे की, हस्तकला, हातमाग, स्थानिक फळे, फुले यांची विक्री-खरेदी.
    • जागतिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध पायाभूत सुविधा व गोष्टींचा विकास करणे.
    • पर्यटनाद्वारे आर्थिक आणि सामाजिक विकास करून रोजगार वृद्धी करणे.
    • शाश्वत पर्यटनाचा (Sustainable tourism) विचार करून दत्तक घेतलेल्या वारसा स्थळाचा विकास आणि त्याची कार्यप्रणाली सुनिश्चित करणे.

    एकंदरीत वरील उद्दिष्टांवरून हे दिसून येते की, या दत्तक घेतलेल्या वारसा स्थळाचे जतन आणि पर्यटन-पूरक विकास हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.

    वारसा दत्तक योजनेमध्ये कोण सहभागी होऊ शकतात?

    कोणतीही सार्वजनिक अथवा खाजगी संस्था, याशिवाय कोणतीही एखादी व्यक्ती या योजनेद्वारे स्मारके किंवा वारसा स्थळे दत्तक घेऊ शकतात. विशेषतः पर्यटन संस्था आणि संघटनांना यामध्ये प्राधान्य असते.

    वारसा दत्तक योजनेमध्ये कोण-कोणती स्थळे येतात?

    सध्या एकूण 93 वारसा स्थळांची यादी या योजनेसाठी राष्ट्रीय पर्यटन मंत्रालयाने उपलब्ध करून दिली आहे. त्यापैकी 4 स्थळे आजमितीस दत्तक गेली आहेत. त्या चारपैकी – लडाख, जम्मू-काश्मीर मधील माउंट स्टोक कांगरी ट्रेक मार्ग आणि उत्तराखंड मधील गंगोत्री मंदिर परिसरगोमुख मार्ग ही दोन नैसर्गिक वारसा स्थळे Adventure Tour Operators Association of India (ATOAI) ने 31 जानेवारी 2018 ला दत्तक घेतली आहेत. तर दिल्लीचा लाल किल्ला आणि आंध्रप्रदेशातील गंडिकोटा किल्ला, ही दोन ऐतिहासिक वारसा स्थळे दालमिया भारत लिमिटेडने 13 एप्रिल 2018 रोजी दत्तक घेतली आहेत.

    वारसा दत्तक योजनेची प्रक्रिया काय आहे?

    राष्ट्रीय पर्यटन मंत्रालयाने एकूण तीन विभागात वारसा स्थळांची विभागणी केली आहे. ही विभागणी पर्यटक भेटीच्या संख्येवरून हिरव्या, निळ्या आणि केशरी अशा गटात केली आहे. त्यामध्ये हिरव्या गटातील वारसा स्थळ निवडल्यास त्यासोबत निळ्या अथवा केशरी गटातील अजून एका वारसा स्थळास दत्तक घेणे अनिवार्य आहे. परंतु निळ्या अथवा केशरी गटातील वारसा स्थळासाठी, हिरव्या अथवा इतर गटातील वारसा स्थळ दत्तक घेण्याची सक्ती नाही.

    या योजनेसाठी महाराष्ट्रातून बिबी-का-मकबरा (औरंगाबाद) आणि कान्हेरी गुंफा (मुंबई) यांचा हिरव्या गटामध्ये समावेश आहे. तर दौलताबाद किल्ला (औरंगाबाद), कार्ले लेणी, आगा खान पॅलेस, शनिवारवाडा (पुणे) यांचा निळ्या गटात व केशरी गटामध्ये भाजेलेण्याद्री लेण्यांचा समावेश आहे.

    वारसा दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या संस्थेने अथवा व्यक्तीने प्रथम त्यास दत्तक हव्या असलेल्या वारसा स्थळाचा अभ्यास करून आवडीचा प्रस्ताव (Expression of Interest – EoI) सादर करावा लागतो. आलेल्या सर्व प्रस्तावाचा विचार करून राष्ट्रीय पर्यटन मंत्रालय, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि सांस्कृतिक मंत्रालयाने नियुक्त केलेल्या समितीकडून योग्य अश्या प्रस्तावाचा विचार केला जातो. त्यानंतर सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून वारसा दत्तक दिला जातो. हा सामंजस्य करार पाच वर्षांसाठी असेल व एकूण कामगिरी पाहून त्यात वाढ केली जाऊ शकते.

    वारसा दत्तक योजना ही सार्वजनिक-खाजगी भागीदारी (Public-Private Partnership) या तत्त्वावर आधारित आहे, आणि वारसा दत्तक घेणारी संस्था किंवा व्यक्ती ही स्मारक मित्र (Monument Mitra) म्हणून गणली जाईल. या संस्था या योजने मध्ये सहभागी होणं म्हणजे, त्या संस्थेच एक व्यवसाईक-सामाजिक जबाबदारीच कार्य (CSR – Corporate Social Responsibility) असेल. त्यामुळे वारसा दत्तक घेणाऱ्या संस्था या आर्थिक मिळकतीपेक्षा, सांस्कृतिक मूल्यांवर भर देणाऱ्या असतील हे पाहूनच त्यांना सहभागी करून घेतले जाते. वारसा स्थळांचे प्रवेश मूल्य हे ASI ने ठरवलेलेच असेल.

    सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्व ही थोडीफार बांधा-वापरा-हस्तांतरित करा (Build–Operate–Transfer – BOT) या प्रणाली प्रमाणेच कार्य करते. या BOT योजने अंतर्गतच राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांचा विकास केलेला आहे त्यामुळे आज भारतातील सर्व खेडी-शहरे जोडली जात आहेत.

    वारसा दत्तक योजना – फायदे व तोटे –
    • पर्यटकांसाठी आवश्यक त्या मुलभूत सुविधांचा विकास होईल आणि त्यामुळे जागतिक व स्थानिक पर्यटकांमध्ये वाढ होण्याची शक्यता दिसते.
    • वारसा स्थळाची देखभाल आणि माहिती प्रसारण होईल.
    • मोफत WiFi, ई-वाहन व त्यासाठी लागणारे चार्जिंग पाॅइंट्स उपलब्ध होतील.
    • कचरा व्यवस्थापन, बाग-बगीचा, विद्युतीकरण, सूचना व मार्गदर्शक फलके, फर्निचर, माहिती केंद्र यासारख्या इतर आवश्यक घटकांचा विस्तार व विकास होईल.
    • मोबाईल App, 3D mapping, AR/VR यासारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा अंतर्भाव केला जाईल, जी आधुनिक युगाची गरज आहे.
    • विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करुन, विद्युत रोषणाई, संगीत व नृत्य यासारख्या कार्यक्रमांची आखणी व अंमलबजावणी सुरु होईल.
    • 2022 साली भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यात विविध कला व कलाकृतींचे विशेष सादरीकरण करणे हे दालमिया भारत उद्योगसमूहास सक्तीचे केले आहे.

    सद्यस्थितीला तोट्यापेक्षा फायदेच अधिक दिसत आहेत. जर या योजनेची अंमलबजावणी व्यवस्थितपणे नाही झाली तर मात्र त्याचे तोटे दिसायला सुरु होतील. परंतु या योजनेमुळे बेजबाबदार पर्यटकांस मात्र चांगलीच चपराक बसेल. वारसास्थळी अस्वच्छ व अश्लील वर्तन करण्यास मज्जाव येईल. स्मारकांवर लिखाण करणे, निषिद्ध भागात वाहतूक करणे, स्मारकांवर चढून छायाचित्र काढणे, स्वच्छतागृहाची नासधूस करणे या कृतींना आळा बसेल.

    शिवाय आजपर्यंत दुर्लक्ष केलेल्या घटकांचा अंतर्भाव अश्या वारसा स्थळी असेल. जसे की, लहान मुलाबाळांसाठी कपडे बदलण्यासाठी विशेष जागा असेल, अपंगासाठी ये-जा करण्यासाठी विशेष मार्ग, CCTV, अपंगाना पिता येईल अश्या उंचीवर शुद्ध पाणी असेल. उपहारगृह व हस्तकला विक्री केंद्र असेल. अश्या अनेक छोट्या-मोठ्या घटकांची दखल घेऊन दत्तक घेतलेल्या वारसा स्थळाचा पर्यटनपूरक विकास हेच या योजनेचा हेतू आहे.

    स्मार्ट-आयडी द्वारे केली जाणारी तिकीट विक्री आणि त्याद्वारे मिळणारी पर्यटन प्रवाह व पर्यटक प्रोफिलिंगची माहिती, ही आम्हा पर्यटन अभ्यासकांसाठी नक्कीच सुलभता आणेल. स्मार्ट-आयडीमध्ये राष्ट्रीय ओळखपत्र व आंतरराष्ट्रीय पासपोर्टचा समावेश असेल, त्याद्वारे वय, राष्ट्रीयत्व, ओळख क्रमांक यासारख्या माहितीची नोंद ठेवली जाईल.

    2025 पर्यंत भारत – जागतिक प्रवास आणि पर्यटनाच्या यादीत चाळीसाव्या स्थानावरून उच्चांकी आघाडी घेईल असा विश्वास आहे. त्यामुळे एवढ्या कमी कालावधीमध्ये पर्यटनपूरक सुविधांची उपलब्धता, अपुऱ्या मनुष्यबळामुळे सरकारी यंत्रणेस अशक्य आहे. त्यासाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारी हाच एक पर्याय पर्यटन विकासासाठी सुलभ व सुरक्षित आहे. भारताने गतवर्षी सांस्कृतिक संपदा आणि व्यावसायिक प्रवासामध्ये 5.3 गुणांक मिळवून 136 पैकी नववे स्थान मिळवले आहे. आपला सांस्कृतिक वारसा ही एक जागतिक स्तरावर पर्यटकांना आकर्षित करणारी उपलब्ध मालमत्ता आहे. येत्या काळात अजून बऱ्याच योजनांद्वारे वारसा व पर्यटन-पूरक विकास कार्याचे प्रयोग केले जातील. त्यामुळे सर्वांनी जागरूकपणे भारतीय पर्यटन विकास कार्यास अडथळा येणार नाही याची खबरदारी घ्यावी.

    [लेखक पर्यटन अभ्यासक आहेत.]