बलपराक्रमशक्तीप्रतापप्रभावादीभिर्विभावैरुत्पद्यते
बल, पराक्रम, शक्ती, प्रताप आणि प्रभाव या विभावांमुळे ज्या रसाचा उद्भव होतो, तो म्हणजे वीर रस. उत्साह हा वीर रसाचा स्थायीभाव आहे, त्यामुळे याला सात्विकता लाभली आहे. दया-वीर, दान-वीर, धर्म-वीर आणि युद्ध-वीर असे वीर रसातील विविध भाव व्यक्त होतात. याशिवाय असुर वीर आणि लोभ वीर या संकल्पनाही वीर रसाशी निगडीत आहेत.
अर्थात देवीचे युद्ध वीर स्वरूपातील रणरागिणीचे रूप शिल्पकारांनी महिषासुरमर्दिनीच्या शिल्पांमधून अभिव्यक्त केले आहे. नवरस आणि देवी शिल्पे या लेखमालिकेत पूर्वी प्रस्तुत झालेल्या देवीच्या शृंगार, हास्य, करुण आणि रौद्र रसापेक्षा वीर रसातील महिषासुरमर्दिनी स्वरूपाची लोकप्रियता भारतीय परंपरेत प्राचीन काळापासून दिसते. त्यामुळे प्राचीन नाण्यांवर, मंदिराच्या बाह्य भिंतींवर, स्वतंत्र शिल्प रूपामध्ये किंवा चित्र रूपामध्ये दुर्गेचे दर्शन होते.
महिषासुरमर्दिनी
देवी दुर्गेचा उद्भव महिषासुराचा विनाश करण्यासाठीच झाला होता. देवी दुर्गेच्या मूर्तीचा विचार केला तर, इ.स. पहिल्या शतकापासून तिच्या विविध रूपांचे अंकन झाल्याचे भौतिक पुरावे सापडतात. कुषाण काळातील टेराकोट्टा फलकांवर दुर्गेचे मूर्त रूप साकार झालले दिसते. गुप्त काळामध्येही ती जनसामान्यांमधील लोकप्रिय आणि पूजनीय देवता होती. याशिवाय तंत्र साहित्य, आगम आणि शिल्प ग्रंथही दुर्गेच्या महिषासुरमर्दिनी स्वरूपाचे वर्णन करतात. शिल्परत्न या ग्रंथामध्ये देवी कात्यायनी म्हणजेच महिषासुरमर्दिनी स्वरूप आहे असा उल्लेख येतो.
महिषासुरमर्दिनी या विरांगनेचा उद्भव आणि स्वरूप समजून घेण्यासाठी मात्र मार्कंडेयपुराण, वामन पुराण, वराह पुराण, शिव पुराण, स्कन्द पुराण, देवी भागवत, कलिकापुराण अश्या पुराणांचा आधार घ्यावा लागतो. रम्भ या दैत्याचा पुत्र म्हणजे महिषासूर. तपोबलाच्या जोरावर महिषासुर ब्रह्मदेवांकडून वरदान प्राप्त करतो की, त्याला कोणत्याही पुरुष देवांकडून मृत्यू येणार नाही. त्यामुळे देवतांना हरवून महिषासुर स्वर्गावर त्याचे आधिपत्य स्थापन करतो. इंद्र आणि इतर देव ब्रह्मदेवाकडे जातात. ब्रह्मदेवांच्या संगण्यावरून विष्णू आणि शिव यांना सर्व देव शरण जातात, आणि झाला प्रकार कथन करतात. महिषासुराच्या उदामपणाचा संताप येऊन भगवान विष्णूच्या मुखातून तेजाग्नी बाहेर येतो, तसेच दिव्य तेज शंकरातून उत्पन्न होते. अश्याच प्रकारे सर्व देवतांमधून तेज प्रकट होऊन ते एकत्रित होते. या दिव्य तेजातून स्त्री उत्पन्न होते, ती देवी कात्यायनी.
प्रत्येक देवांच्या तेजाने देवीच्या सर्वांगाचा उद्भव होऊन साक्षात असुरमर्दिनी प्रकट होते. भगवान शंकराच्या तेजापासून देवीचे मुख तयार होते. यमाच्या तेजाने तिचे लांब सडक काळेभोर केस तयार होतात. विष्णूच्या तेजाने संपन्न अश्या तिच्या अठरा भुजा तयार होतात. चंद्रमाच्या तेजाने देवीचे स्तनमंडल तयार होतात. देवेंद्राच्या तेजाने कटीप्रदेश तर वरुण देवाच्या तेजाने तिच्या मांड्या आणि पाय तयार होतात. भूमीदेवीच्या तेजाने नितंब, ब्रह्मदेवाच्या तेजाने पावले आणि घोटा, सूर्यदेवाच्या तेजाने हाताची बोटे आणि वसू देवतांच्या तेजाने पायाची बोटे तयार होतात. यक्षराज कुबेराच्या तेजाने नासिका उत्पन्न होते. दक्ष प्रजापतीच्या तेजाने दंतपंक्ती तर वायू देवाच्या तेजाने तिचे कान बनतात. अग्नी देवाच्या तेजाने तिसरा नेत्र देवी धारण करते. संध्या देवीच्या तेजाने तिच्या भुवया तर अरुण देवाच्या तेजाने तिचे ओठ तयार होतात.
समस्तदेवानां तेजोराशिसमुद्भवाम्
समस्त देवतांच्या तेजाने उद्भवलेल्या दुर्गा देवीचे स्वरूप अतिशय मोहक, निश्चल असे असते. सर्व देवता दुर्गेला महिषासुराच्या वधासाठी त्याची अस्त्रे आणि शस्त्रे अर्पण करतात.
शिवाकडून देवीला त्रिशूळ आणि विष्णूकडून चक्र प्राप्त होते. वरुणाकडून शंख आणि पाश, अग्नीकडून शक्ती, यमाकडून काल-दण्ड. वायू धनुष्य तर सूर्य तेजस्वी बाण प्रदान करतो. इंद्र त्याचे वज्र आणि ऐरावताच्या गळ्यातील घंटा देतो. कुबेराकडून महाशक्तिशाली गदा आणि त्याचे दिव्या मधुपात्र देतो. ब्रम्हाकडून कमण्डलु, कालाकडून धारधार असे खड्ग आणि संरक्षक अशी ढाल प्राप्त होते. विश्वकर्माकडून तेजस्वी असा परशु आणि अनेक प्रकारचे अस्त्र, अभेद्य कवच देवीला प्राप्त होते. समुद्रदेव देवीला उज्ज्वल असा पुष्पहार देतात. दिव्य चूडामणी, जटामुकुटाची शोभा वाढविण्यासाठी अर्धचंद्र, कानांमध्ये दोन कुंडले, दंडामध्ये केयूर, पायांत रुळणारी नाजूक नुपूरे, गळ्यात कंठाहार, हातांमध्ये दिव्य कंकण, बोटांमध्ये विवध रत्नजडित अंगठ्या, ही सर्व आभूषणे प्रदान करतात. हिमालय पर्वत देवीला सिंह हे वाहन अर्पण करतो.
अनंत सूर्याचे तेज जिच्यामध्ये एकवटले आहे, अश्या त्या देवी दुर्गेच्या आवेशपूर्ण गर्जनेने समस्त आकाश, पृथ्वी हादरून जातात. त्या दिव्य गर्जनेचे प्रतीध्वनी असुर सेनेच्या मनात कंप निर्माण करतात. असुर सेनेशी अविश्रान्तपणे देवी युद्ध करताना तिच्या चेहऱ्यावर परिश्रम, थकवा यांचा तिळमात्रही लवलेश नव्हता.
अश्याच स्वरूपात ती शिल्पातून साकार झालेली दिसते. हे महिषासुरमर्दिनीचे शिल्प इ.स 12 शतकातील पाल शैलीतील आहे. अतिशय मोहक देह असलेली परंतु तिच्या देहबोलीतून आवेग, उत्साह सळसळताना दिसतो आहे. त्रिभंग अवस्थेमध्ये ती उभी असलेली दाखवतात. तिचा उजवा पाय सिंहावर आणि डावा पाय महिषाला पायाने दाबताना दाखवतात. त्यामुळे डावा पाय थोडा उचललेला म्हणजे अलिढ आसनात दिसतो. देवीच्या सोळा हातांमध्ये डावीकडून असुराच्या छातीत घुसवलेला त्रिशूळ, चक्र, अंकुश, वज्र, हातोडी, शक्ती, खड्ग आणि बाण ही आयुधे आहेत. उजव्या हातामध्ये ढाल, धनुष्य, घंटा, दर्पण, सूची मुद्रा, ध्वज आणि पाश ही आयुधे आहेत तर एका हाताने असुराचे केस पकडलेले आहेत. कमळावर वीर रसपूर्ण देवी विग्रह, असुराचे निर्दालन करताना शिल्पांकित केला आहे.
महिषासुरमर्दिनीच्या या शिल्पातून दृढनिश्चय, अविचल भाव, स्थिरता, धैर्य, शौर्य, चातुर्य या सर्वांचा मिलाफ दिसतो आहे. या युद्ध वीर रसातील महिषासुरमर्दिनीचे देवी शिल्प म्हणजे स्त्री शक्तीचे साकार दर्शन घडवणारे आहे.
पुढील भागात देवी शिल्पातील भयानक रसाचा परामर्श घेऊ.
6 thoughts on “वीर रस – महिषासुरमर्दिनी : नवरस आणि देवी शिल्पे”