प्रत्येक अनुभव हा आपल्याला समृद्ध करत असतो. शिवाय नमः हाही त्यापैकी एक अनुभव होता. बोधसूत्रच्या माध्यमातून मी श्रावण महिन्यामध्ये शिवाय नमः हे सदर सुरु केले. दर सोमवारी शिवाच्या वेगवेगळ्या रूपांना शब्दबद्ध करत होते. शिवाय नमः – एक अनुभव या शेवटच्या लेखाने मी या शृंखलेला पूर्णविराम देणार आहे. या प्रवासात नेहमीप्रमाणे थोडी धडपड, पडझड आणि नंतर सुंदर लेख संग्रहित होत गेले. कोणत्याही गोष्टीच ज्ञान करून घायचं म्हणजे हे सर्व स्वाभाविकच आहे. शृंखला म्हणजे सातत्याने केलेल्या अनेकविध गोष्टींची एकत्रित गुंफण. श्रावणामध्ये शिव देवतेवर आधारित ही संकल्पना शिवाचे रुद्र, संहारक, मुग्ध आणि महाविलयन स्वरूपाचा वेध घेणारी होती. ही लेखमालिका मी सातत्याने लिहून पूर्ण करू शकले याचा आनंद आहे. रुद्र या संकल्पनेपासून प्रत्येक लेखांमध्ये कधी वाङ्मय आणि पुराणे, कधी दैवतशास्त्र, कधी मूर्तीशास्त्र, कधी नाणकशास्त्र तर कधी अभिलेखांचा आधार घेतला. या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्हा वाचकांचा प्रतिसाद ही लेखमालिका पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करत होता. या लेखमालिकेमधील चौथ्या लेखाने बोधसूत्रवर माझे एकूण 25 लेख मी शब्दबद्ध केले. 25 लेख म्हणजे तसे काही फार निश्चितच नाही, पण पुढच्या लिखाणासाठी प्रेरणा देणारे नक्कीच आहेत.
या संपूर्ण लेखमालिकेचा प्रवास शिवाय नमः मध्ये संकलित करावा म्हणून या लेखाचे प्रयोजन आहे.
1. रुद्राय नमः
रुद्राय नमः या पहिल्या लेखामध्ये शिवरूपाची सर्वांत प्राथमिक अवस्था, प्राचीन वाङ्मयातून येणाऱ्या रुद्रापासून सुरु होताना दिसते. रुद्र ही अमूर्त स्वरूपातील एक संकल्पना. ही अभ्यासताना काही कथांच्या आधारे, काही श्लोकांच्या आधारे रुद्राचा शोध घेण्याचा प्रयत्न मी केला. प्राचीन ग्रंथातून उमटणाऱ्या भयानक रुद्राच्या संकल्पना पुराणकाळापर्येंत येताना शिव या सौम्य स्वरूपात कश्या विलीन होताना दिसतात याचा आढावा या लेखाच्या माध्यमातून मला घेता आला. रुद्राला म्हणून संबोधलेल्या नावांचा अर्थ जाणून घेऊन रुद्र ही संकल्पना हळूहळू साकार होते. हा पिनाकपाणी रुद्र म्हणजे शिवाचे अलौकिक रूप आहे जो विनाश आणि सृजन यांचे एकत्व दाखवतो.
2. त्रिपुरान्तकाय नमः
शिवाय नमः मधला दुसरा लेख म्हणजे, त्रिपुरान्तकाय नमः. तीन मायावी पुरांचा सर्वनाश करायला सज्ज झालेला संहारक शिव, त्रिपुरारी बनून या लेखातून अभिव्यक्त झाला आहे. पुराणांमध्ये त्रिपुरान्तक आख्यानाचे अतिशय सुंदर आणि मनोरंजक वर्णन प्रस्तुत केलेले आहे. ते वाचताना किंवा शब्दबद्ध करताना मीही त्या संपूर्ण कथाभागाचा आनंद घेत होते. शिल्पातील निरीक्षणे (Observations) कथानकाशी साधर्म्य दाखवणारी असली तरी शिल्प साकारताना शिल्पकारला येणाऱ्या काही मर्यादाही जाणवल्या. हा लेख संकलित करताना, वेळेच्या अभावी शिल्पातले बारकावे लेखामध्ये समाविष्ट करता आले नाहीत, त्याची थोडी खंत आहे. या लेखासाठी माझ्या एका मैत्रिणीच्या प्रतिसाद आला, की संपूर्ण शिल्प बघयला आवडेल. तर भविष्यात त्रिपुरान्तकाच्या रेखाचित्रांचा संपूर्ण आढावा घेऊन एक लेख पुन्हा लिहीन, अशी इच्छा मी व्यक्त करते. दुर्गांचा विनाश करण्यासाठी बाण सोडण्यपूर्वीचा शिल्पांमध्ये गोठवला तो एक क्षण शब्दांमध्ये उतरवताना संपूर्ण कथाभागाची नाट्यमयता शिल्पाच्या आधारे शब्दबद्ध करणे जास्त सुलभ झाले.
3. उमामहेश्वराय नमः
या लेखमालिकेतील तिसरा लेख उमामहेश्वराय नमः. खरतर हा लेख निशब्द करणारा आहे. उमा महेश्वर या दोन तत्त्वांची भावनिक सुसूत्रता आपल्याला प्रत्येक भौतिक साधनांमधून दिसते. उमा महेश्वर रूपाने, संपूर्ण सृष्टीतील दैवी तत्त्व आणि त्या तत्त्वाशी संधान बांधणाऱ्या मानवी भावभावनांच्या मुग्धतेचे मूर्त रूप या लेखामध्ये शब्दबद्ध करण्याचा एक छोटा प्रयत्न मी केला. एक असा अनुबंध जो सृष्टीतील चैतन्य साकार करतो. काव्यातून, नाणी आणि शिल्पांसारख्या भौतिक साधनांमधून उमेचे स्वतंत्र अस्तित्व जे शिवरूपात एकरूप होणार आहे याचा आढावा या लेखाच्या निमित्ताने मी घेतला आहे.
4. हरीहाराय नमः
हरीहाराय नमः हा शिवाय नमः या शृंखलेमधील शेवटचा लेख. या लेखांचे पूर्वनियोजन करतानाच शेवट हरिहर या स्वरूपाने करायचा हे मी ठरवले होते. योगायोगाने श्रावणातील चौथ्या सोमवारी श्रीकृष्ण जयंती आली. त्या दिवशी मी हरीहाराय नमः या शिव रूपावर लेख सादर केला. शिव आणि विष्णू या दैवतशास्त्रातील प्रमुख देवतांची ही संयुक्त मूर्ती. भारतातील आणि भारताबाहेरील ह्या संयुक्त संकल्पनेची लोकप्रियता महाविलयन प्रक्रियेची साक्ष देतात. जी अभिलेखातही उमटली आहेत. शिव आणि विष्णू या दोन स्वतंत्र सिद्धांतांवर आधारित देवतांचे एकीकरण दाखवणारे हरिहर हे स्वरूप आहे.
शिवाय नमःच्या रूपात शिवाच्या काही स्वरूपाचा थोडक्यात आढावा इथे एकत्रित संकलित केला आहे. वाचकांचा अभिप्राय हा नेहमीच प्रेरणा देणारा असतो, त्यामुळे माझा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला, हे मला ऐकायला नक्की आवडेल. श्रावणातील या शेवटच्या सोमवारी शिवाय नमः म्हणून या शृंखलेला इथेच पूर्णविराम देते.
One thought on “शिवाय नमः – एक अनुभव”